आता भुंकून करतो संभाषण
थायलंडमध्ये एक असा मुलगा आढळून आला आहे, जो बोलणे जाणत नाही. तो केवळ भुंकून संभाषण करतो, असा दावा करण्यात आला आहे. या मुलाचे वय 8 वर्षे असून त्याच्या या वर्तनामागील चकित करणारे कारण समोर आले आहे. थायलंडच्या उट्टराडिट प्रांतात राहणारा 8 वर्षांचा मुलगा कुणीच लक्ष देत नसल्याने श्वानांसोबत राहू लागला, कारण त्याची आई ड्रग अॅडिक्ट होती आणि त्याचा भाऊ देखील कधी त्याच्यासोबत राहत नव्हता. यामुळे मुलगा श्वानांसोबत वेळ घालवू लागला. तो श्वानांमध्ये इतका मिसळून गेला की, आता तो भुंकूनच बोलतो, असा दावा करण्यात येत आहे. मुले आणि महिलांसाठी काम करणारी संस्था पवीना होंगसाकुलला अमली पदार्थांनी प्रभावित रेड झोनमध्ये राहणाऱ्या एका 8 वर्षीय मुलाविषयी कळले. त्याच्याकडे त्याची आई आणि मोठ्या भावाने दीर्घकाळापर्यंत लक्ष दिले नव्हते. तसेच परिवाराचे लोक त्याच्याशी बोलत नव्हते तसेच त्याची पर्वाही करत नव्हते.
श्वानांसोबत राहायचा
अशा स्थितीत हा मुलगा स्वत:च्या घरानजीक असलेल्या श्वानांसोबत वेळ घालवू लागला. आता तो या श्वानांप्रमाणेच वागतो आणि भुंकू लागतो. हे त्रस्त करणारे प्रकरण लॅप लाए जिल्ह्याच्या एका शाळेच्या मुख्याध्यापकाने पवीना होंगसाकुल फौंडेशनच्या निदर्शनास आणून दिले होते.
श्वानांचे अनुकरण
मुलाची आई त्याला केवळ एकदा भत्ता मिळविण्यासाठी शाळेत घेऊन आली होती, परंतु कधीच त्याचा प्रवेश करविला नाही. मुलगा किंडरगार्टनमध्येही गेलेला नाही आणि त्याची आई आणि भावाने त्याला भावनात्मक स्वरुपात त्यागले होते. त्याला एका श्वानांच्या कळपापासून प्रेम मिळाले. याचमुळे तो माणसांप्रमाणे बोलण्याऐवजी श्वानांप्रमाणे भुंकू लागला. तो श्वानांचे अनुकरण करू लागला.
पोलिसांनी दिली पुष्टी
होंगसाकुलने प्रकरणाच्या तपासासाठी लॅप लाए जिल्ह्याच्या पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही मुलाच्या वर्तनाविषयी पुष्टी दिली आहे. मुलाची 46 वर्षीय आई आणि त्याच्या 23 वर्षीय भावाची चौकशी केली असता दोघांच्या शरीरात ड्रग्जचे अंश आढळून आले. ते मुलाचे पालनपोषण करण्यापेक्षा अधिक स्वत:साठी ड्रग्ज मिळवू पाहत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इतर मुलांनी राखले होते अंतर
मुलाची आई अनेकदा पैसे अन् खाण्यासाठी भीक मागायची, ती अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने बहुतांश लोक त्या परिवारापासून अंतर राखायचे. याचमुळे इतर मुले या महिलेच्या मुलासोबत खेळत नव्हती. तर महिला आणि तिचा मोठा मुलगा या मुलाकडे दुर्लक्ष करायचे. याचमुळे त्याने श्वानांच्या कळपात आश्रय घेतला होता.
बालगृहात रवानगी
आता या मुलाला उट्टराडिटच्या बालगृहात पाठविण्यात आले आहे. तेथे तज्ञ तो माणसांप्रमाणे बोलणे शिकेल आणि त्याला योग्य शिक्षण मिळेल हे सुनिश्चित करणार आहेत.









