बिम्समध्ये अमृतधारा दूध बँकेचे उद्घाटन
बेळगाव : न्युमोनियाचे उच्चाटन करण्यासाठी येथील बिम्समध्ये सामाजिक जागृती कार्यक्रम व अमृतधारा (मातेचे दूध बँक) कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री गुंडूराव म्हणाले, न्युमोनियापासून लहान मुलांचे संरक्षण गरजेचे आहे. याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. सहा महिन्यांच्या आतील मुलांना मातेच्या दुधाची आवश्यकता असते. वेळोवेळी लस देऊन रोगांपासून संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले. बिम्स रुग्णालयात अमृत धारा मातेच्या दुधाची बँक उपलब्ध करून दिली आहे. याचे उद्घाटन करताना, बालकाच्या सुदृढतेसाठी मातेचे स्तनपान आवश्यक आहे. यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. नवीन भट्ट, बाल आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे संचालक डॉ. बसवराज दबाडे, आरोग्य खात्याचे आयुक्त डी. रणदीप, डॉ. अरुणकुमार, डॉ. शकिला, डॉ. महेंद्र कापशे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी, बिम्स संचालक डॉ. अशोक शेट्टी, डॉ. व्ही. व्ही. शिंदे आदी उपस्थित होते.









