प्रतिनिधी/ बेंगळूर
आपल्या चार वर्षांच्या मुलाचा खून करून पळ काढणाऱ्या बेंगळूरमधील स्टार्टअप कंपनीच्या महिला सीईओला चित्रदुर्गमध्ये अटक करण्यात आली आहे. चित्रदुर्गच्या आयमंगल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पतीशी वितुष्ट हेच मुलाच्या हत्येचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यातील एका हॉटेलमध्ये मुलाचा खून करून टॅक्सीने बेंगळूरला जात असताना तिच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या जागरुकपणामुळे या गुन्ह्याचा भांडाफोड झाला आहे.
बेंगळूरमधील आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय) स्टार्टअप ‘माईंडफूल एआय लॅब’च्या सहसंस्थापक आणि सीईओ सुचना सेठ (वय 39) आपल्या चार वर्षाच्या मुलासोबत शनिवारी उत्तर गोव्याच्या कॅन्डोलिम (कांदोळी) येथील एका हॉटेलमध्ये उतरली. हॉटेलमध्ये मुलाचा खून करून टॅक्सीने बेंगळूरला जात असताना चित्रदुर्गजवळ तिला अटक करण्यात आली आहे.
सुचना सेठ मुळची कोलकाता येथील आहे. 2010 मध्ये तिचे तामिळनाडू येथील वेंकटरमण यांच्याशी विवाह झाला. 2020 मध्ये उभयतांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. सुनावणीनंतर न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. मात्र, दर रविवारी वेंकटरमण यांना मुलाची भेट घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. पतीने मुलाची भेट घेणे सुचना हिला रूचत नव्हते. वेंकटरमण फिलिपाईन्स येथे कंपनीत नोकरीला होते. त्यामुळे ते व्हिडिओ कॉल करून मुलाशी संवाद साधत होते. त्यामुळे पर्यटनाचे निमित्त करून सुचनाने शनिवारी 6 रोजी गोवा गाठले. तेथील कांदोळी येथील हॉटेलमध्ये 7 रोजी मुलाचा गळा आवळून खून केला. मध्यरात्री 1 वाजता हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना सांगून टॅक्सी मागवून घेण्यास सांगितले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी टॅक्सीसेवा महाग असल्याने विमानाने जाण्याचा सल्ला दिला. मात्र, टॅक्सीनेच जाणार असल्याचे सांगून टॅक्सी मागवून घेतली. हॉटेलमध्ये चेकआऊट करून बेंगळूरला प्रस्थान केले. सुचना यांच्यासमवेत मुलाना नसल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी विचारणा केली. तेव्हा तिने मुलाला मित्राकडे पाठवून दिल्याचे सांगितले.
सकाळी रुम स्वच्छतेसाठी गेलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना रक्ताचे डाग आढळून आले. त्यामुळे संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी कळंगुट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती हॉटेलमध्ये मुलासमवेत आल्याचे आढळले. परंतु चेकआउट करून जाताना एकटीच बाहेर पडत असल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर संशय बळावल्याने कळंगुट पोलिसांनी सुचनाला फोन करून मुलाविषयी चौकशी केली. तेव्हा तिने मुलाला फातोर्डा येथील मित्राच्या घरी पाठविल्याचे सांगितले. पोलिसांनी मित्राच्या घरचा पत्ता विचारल्यानंतर चुकीचा पत्ता दिला. त्यामुळे पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हरला फोन करून कोकणी भाषेत संभाषण करून कार स्थानिक पोलीस स्थानकाकडे नेण्याची सूचना दिली. चित्रदुर्ग जिल्हा पोलीस प्रमुखांनाही फोन करून घटनेविषयी माहिती दिली. त्यानुसार आयमंगल पोलिसांनी महार्गावर कार अडवून तपासणी केली. कारच्या डीकीतील सुटकेसमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सध्या सुचना हिला 6 दिवसांसाठी कलंगुट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आर्टीफिशिअल इंटेलिजन्स तज्ञ
सुचना इंटेलिजन्स एथिक्स एक्स्पर्ट आणि डेटा वैज्ञानिक असून यामध्ये तिला सुमारे 12 वर्षांचा अनुभव आहे. 2021 मध्ये तिचे नाव 100 प्रभावशाली महिलांच्या एआय एथिक्स यादीत समावेश होता. तिच्या लिंकड् इन खात्यावरील माहितीनुसार तिने हॉवर्ड विद्यापीठाच्या बर्कमन क्लाईन सेंटरमध्ये रिसर्च सेंटरमध्ये शिक्षण घेतले होते. स्टार्टअप आणि उद्योग संशोधन प्रयोगशाळेत आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धीमत्ता) अध्ययनातील समस्यांवर तोडगा काढणारी कंपनी तिने बेंगळूर येथे स्थापन केली होती. सुचना यांच्याकडे ‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग’मध्ये पेटंट देखील आहे. तिने एस्ट्रोफिजिक्ससोबत प्लाझ्मा फिजिक्समध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे. तसेच संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदविका मिळविलेली आहे. या अभ्यासक्रमात तिने पहिला क्रमांक पटकाविला होता.









