क्रूरता एकदा अंगात भिनली की माणूस कोणत्याही थराला जातो, सैतानी रूप धारण करत तो कसाही वागतो हे गेल्या आठवडय़ात कोकणातील महाड येथे घडलेल्या घटनेतून दिसून येते. एका निर्दयी आईनेच पतीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या पोटच्या पाच मुलींसह एका मुलास विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सहाही मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने कोकणच नव्हे तर महाराष्ट्रच हादरून गेला.
मूळची उत्तरप्रदेश येथील व सध्या रायगड जिल्हय़ातील महाड तालुक्यातील खरवली येथे राहणाऱया रुना चिखरु साहनी (30) या महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून पोटच्या सहा लहान मुलांना विहिरीत ढकलून दिले. त्याचबरोबर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचवण्यात यश आले आहे. विहीर खोल असल्याने यामध्ये रोशनी (10), करिष्मा (8), रेश्मा (6), विद्या (5), शिवराज (3), राधा (दीड वर्ष) अशा सहाही मुलांचा यामध्ये मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महाड पोलीस तसेच आमदार भरत गोगावले हेदेखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या विहिरीमध्ये शिडी टाकून स्थानिक ग्रामस्थांसह रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नाने सर्व मृतदेह बाहेर काढले. लहानग्यांचे मृतदेह पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. हा सारा प्रकारच भयावह असल्याने या हृदयद्रावक घटनेनंतर पोलीस महासंचालक संजय मोहिते, रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी करत अधिकाऱयांना तपासाबाबत सूचना केल्या.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर जिल्हय़ातील कैपियरगंज तालुक्यातील करमैय्या करीमनगरमधील मुळचे रहिवाशी असलेले हे साहनी कुटुंब यापूर्वी महाड औद्योगिक परिसरात शेलटोली येथे रहात होते. वर्षभरापूर्वी हे कुटुंब खरवली येथे राहण्यास गेले. रूना आणि चिखुरी यांचे 2010 मध्ये लग्न झाले होते. महाड येथे आल्यानंतर तेथेच ते टाईल्स साफसफाईसाठी मजूर म्हणून काम करत होते. चिखुरीला दारूचे व्यसन असल्याने दररोज घरी दोघांच्यात वादविवाद होत असत. पती 2010 पासून सतत चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत शिविगाळ करून मारहाण करत असे. पदरी सहा मुले घेऊन दारूच्या आहारी गेलेल्या पतीबरोबर संसार करताना होणारी ओढाताण यामुळे 30 मे रोजी दोघांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसान या सहाही लहानग्यांच्या जीवावर बेतले.
घटनेच्या दिवशीही पतीने मारहाण करत रूनासह मुलांना घराबाहेर काढले. तू व तुझी मुले मेलात तरी मला फरक पडणार नाही, आजपासून घरात राहायचे नाही असे सांगत धमकी दिली. त्यांनतरही ती आपल्या सहाही मुलांसह पुन्हा घरी गेली असता पतीने घरात न घेता थेट हाकलून दिले. त्यानंतर तिने मुलांसह महादेव रामजी शिर्के यांच्या शेतातील विहीर गाठली. सुमारे 20 फूट खोल असलेल्या या विहिरीत जेमतेम आठ ते दहा फूट चिखलासह पाणी होते. तिने प्रथम दहा वर्षीय रोशनीला विहिरीच्या कठडय़ावरून फेकून दिले. त्यानंतर एकेक करत पाचही मुलाना विहिरीत ढकलले. विहिरीत चिखल आणि पाणी असल्याने सहाही लहानगी त्यामध्ये रूतली. त्यानंतर तीही विहिरीत उतरली. त्याचवेळी तेथून तीन-चार ग्रामस्थ या विहिरीच्या बाजूनेच मार्केटला जात असताना त्यांना काहीतरी येथे घडलंय असे लक्षात आल्यानंतर त्यांनी या विहिरीत उतरण्यासाठी असलेल्या कठडय़ावर थांबलेली महिला दिसली. त्यांनी या महिलेला बाहेर काढले.
ही महिला एकटीच असल्याने तिच्याबरोबर असलेली मुले कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण झाल्यावर मग पुढील प्रकार पुढे आला. त्यामुळे कठडय़ावरूनच या महिलेला बाहेर काढल्याने तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात स्पष्ट होत असल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांनी सांगितले. घटना दुर्दैवी आणि तितकीच भयावह असल्याने साहजिकच तिचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. पतीबरोबरच्या भांडणातून हा प्रकार घडला असला तरी या महिलेने सहाही मुलांना संपवण्याचे इतके टोकाचे पाऊल कसे काय उचलले? हेही महत्वाचे आहे. शिवाय सहा चिमुकल्यांना एक महिला विहिरीत कशी काय ढकलून देवू शकेल? एका मुलाला ढकलून दिल्यानंतर अन्य मुले का पळाली नाहीत? स्वतः यातून ही महिला कशी बचावली? असे अनेक प्रश्न समोर असल्याने महाड पोलीस यंत्रणा साऱया शक्यता तपासून पहात
आहे.
या हृदयद्रावक घटनेवर मानसोपचार तज्ञांच्या मते कोणत्याही आईने आपल्या रागावर ताबा गमावल्याशिवाय असे पाऊल उचलता येत नाही. रागाचा ढीग, आर्थिक संकट, पतीला त्याच्या व्यसनाच्या सवयीमुळे वेळीच उपचार न करणे, आगाऊ समुपदेशन इत्यादी कारणे या घटनेमागे आहेत. पत्नी आणि पती यांच्यातील क्षुल्लक वादात कोणीही मागे हटू इच्छित नाही हे सध्याच्या काळातील चिंतेचा आणखी एक पैलू आहे. त्या महिलेचे आधी समुपदेशन व्हायला हवे होते. मात्र हालाकीची परिस्थिती, सोबत व्यसनी पती, सहा मुलांचा सांभाळ आणि अशिक्षितपणा अशा परिस्थितीत समुपदेशन याचा अर्थतरी तिला कसा कळणार? या घटनेचा विचार करता अनेक कारणे पुढे येतात. त्यामध्ये टोकाच्या व्यक्तिमत्त्वासह मद्यपी विकार आणि पतीची मानसिक समस्या, पत्नीवर संशय घेणे आणि तिच्याशी भांडणे, तसेच घरगुती जबाबदाऱया पार पाडताना आवेग गमावणे आणि परस्पर संबंध कमी होणे, स्त्राrचे कमालीचे नैराश्य या घटनेत प्रकर्षाने जाणवत आहे.
निर्दयी मातेने आपल्या गुन्हय़ाची कबुली देतानाच पतीविरोधात तक्रारही दिली
आहे. त्यामुळे पतीवर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, तर महिलेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पोलिसांनी अटकही केली आहे. कुटुंबातील अंतर्गत कलहाचा वाद इतका टोकाला गेला की त्यातून घडलेल्या घटनेत आपल्या इवल्याशा भाडय़ाच्या खोलीत एकमेकांबरोबर बागडणारी सहाही भावंडं आज या जगात राहिली नाहीत. आई-बापही खिन्नपणे पोलीस कोठडीत बसले आहेत.
राजेंद्र शिंदे








