केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहिती ः भाषा-बोलीभाषांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील 576 भाषा अन् बोलीभाषांसंबंधी मातृभाषा सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. गृह मंत्रालयाच्या 2021-22 च्या वार्षिक अहवालानुसार प्रत्येक स्वदेशी मातृभाषेच्या वास्तविक स्वरुपाला संरक्षित करणे आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रात (एनआयसी) एक ‘वेब’ संग्रह स्थापन करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
वेब संग्रह स्थापन करण्याकरिता स्वदेशी भाषांशी निगडित माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. भारतीय मातृभाषा सर्वेक्षण (एमटीएसआय) प्रकल्पाचे काम 576 मातृभाषांच्या ‘फील्ड व्हिडिओग्राफी’सह यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
भारतीय भाषा सर्वेक्षण (एलएसआय) हे एक नियमित संशोधन कार्य आहे. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या प्रकाशनांमध्ये एलएसआय झारखंडचे काम पूर्ण झाले आहे. एलएसआय हिमाचल प्रदेशचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. एलएसआय तामिळनाडू आणि उत्तरप्रदेशचे क्षेत्रीय कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मातृभाषांच्या ‘स्पीच डाटा’चा संग्रह करण्याच्या उद्देशाने याचा व्हिडिओ ‘एनआयसी सर्व्हर’वर शेअर करण्यात येणार आहे. आगामी जनगणनेत अत्याधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानासह अनेक नवे पुढाकार घेण्यात आले आहेत, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे जनगणनेचे काम रोखण्यात आले होते.









