डिसेंबरपर्यंत 100 बेडचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट : रुग्णांना अधिक सुविधा मिळणार
बेळगाव : जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसुती विभागात येणाऱ्या गर्भवती महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात जागेचा अभाव निर्माण होत असल्याने केंद्र सरकारच्या मदतीने 100 बेडचे ‘माता आणि बाळ रुग्णालय’ उभारण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 20 कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत सदर रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यास बिम्स प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये सरकारकडून अनेक सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच प्रसुती विभागात स्वच्छतेबरोबर गर्भवती महिलांची व नवजात बालकांची अधिक दक्षता घेतली जात आहे. तसेच सरकारच्या योजनांचा लाभ करून दिला जात आहे. त्यामुळे प्रसुती विभागात येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या अधिक झाली आहे. जागेचा अभाव निर्माण होत असल्याने केंद्र सरकारच्या सहयोगाने माता आणि बाळ रुग्णालय उभारण्यात येत आहे. सदर रुग्णालयाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी बिम्स प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या प्रसुती विभागात 200 बेड उपलब्ध आहेत. मात्र, जागेची कमतरता पडत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बिम्सतर्फे सरकारला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार केंद्र सरकारच्या मदतीतून माता आणि बाळ रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. इमारतीचे काम गतीने सुरू आहे. कंत्राटदाराने येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार प्रयत्न केले जात आहेत. या रुग्णालयामुळे गोरगरीब नागरिकांना आणखी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
केंद्र सरकारच्या अनुदानातून माता आणि बाळ रुग्णालय निर्माण करण्यात येत आहे. 100 बेडचे हे रुग्णालय असून केंद्र सरकारने 20 कोटीचे अनुदान मंजूर केले आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
– अशोककुमार शेट्टी, बिम्स संचालक









