हत्येनंतर मुलाकडून अंडा-करी पार्टी ः मृतदेहाचा दुर्गंध लपविण्यासाठी रुम-प्रेशनरचा वापर
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये पब्जी गेम खेळू न दिल्याने 16 वर्षीय मुलाने स्वतःच्या आईची गोळय़ा घालून हत्या केली आहे. तसेच तीन दिवसांपर्यंत त्याने घरातच आईचा मृतदेह लपवून ठेवला. हत्येनंतरची रात्र या मुलाने स्वतःच्या 10 वर्षीय बहिणीसोबत घरातच घालविली. दुसऱया दिवशी बहिणीला घरात कैद करून तो मित्राच्या घरी गेला. रात्री मित्राला सोबत आणून ऑनलाईन ऑर्डर करत अंडाकरीची पार्टी केली.

तिसऱया दिवशी पुन्हा मित्रांसोबत घरात त्याने पार्टी केली. मृतदेहाचा दुर्गंध येऊ नये म्हणून आरोपी मुलाने रुम पेशनरचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला होता. परंतु मृतदेहाचा दुर्गंध बाहेर फैलावू लागल्यावर त्याने रात्री वडिलांना व्हिडिओ कॉल करून घडलेला प्रकार सांगितला.
मूळचे वाराणसीचे रहिवासी नवीनकुमार सिंह हे सैन्यात ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर आहेत. ते सध्या पश्चिम बंगालमध्ये नियुक्त आहेत. लखनौत त्यांचे घर असून तेथे त्यांच्या पत्नी साधना (40 वर्षे), 16 वर्षीय मुलगा आणि 10 वर्षीय मुलगी राहत होती. मुलाने व्हिडिओ कॉलमध्ये आईचा मृतदेहही दाखविला होता. यामुळे धक्का बसलेल्या नवीन यांनी नातेवाईकाला फोन करून त्वरित घरी पाठविले होते. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस देखील घरातील स्थिती पाहून हैराण झाले.









