आरोपीच्या पत्नीची साक्ष ठरली महत्त्वाची : दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल
बेळगाव : पत्नीला सासरी पाठविण्यास टाळाटाळ करणाऱ्या सासूचा कटरने गळा चिरून खून करणाऱ्या जावयाला न्यायालयाने जन्मठेप तर त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला एक महिन्याची शिक्षा ठोठावली आहे. दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश गुरुराज शिरोळ यांनी ही शिक्षा सुनावली आहे. बसवराज विजयकुमार कुद्रेमोती (वय 38, रा. नरगुंद) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला मदत करणारा उमेश नागठाण याला एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बसवराज याने सासू शोभा बसवराज मिरजी उर्फ सत्तीगेरी (वय 50) हिचा कटरने गळा चिरून दि. 23 मार्च 2014 रोजी खून केला होता.
आरोपीची पत्नी फिर्यादी लक्ष्मी बसवराज कुद्रेमोती (वय 30) ही बाळंतपणासाठी यादवाड येथील आपल्या माहेरी आली होती. तिला मुलगा झाला. मात्र तिची तब्येत खालावली. त्यामुळे सासरी पाठवून देण्यास तिची आई मयत शोभा हिने नकार दिला. नरगुंद येथून दोनवेळा आरोपी बसवराज हा पत्नीला बोलाविण्यासाठी आला. मात्र तिची तब्येत ठिक नाही, त्यामुळे आम्ही पाठवून देऊ शकत नाही, असे सासरच्यांनी सांगितले. त्यानंतर दि. 23 मार्च 2014 रोजी आरोपी बसवराज आणि मित्र उमेश हे पत्नीला बोलाविण्यासाठी आले. यावेळीही सासू शोभा हिने नकार दिला. तुच माझ्या पत्नीला पाठवून देण्यास टाळाटाळ करत आहेस, असे म्हणत रागाने खिशातून आणलेल्या कटरने शोभाचा गळा चिरला. यावेळी तिचा मुलगा नागराज याला उमेशने पकडले. यामध्ये शोभाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुलगोड पोलीस स्थानकामध्ये भा.दं.वि. 302, 341, सहकलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयामध्ये त्याच्यावर दोषारोप दाखल केले. त्याठिकाणी साक्षी, पुरावे तपासण्यात आले. त्यामध्ये तो दोषी आढळल्याने जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड भरला नाही तर सहा महिने अधिक शिक्षा भोगावी लागणार आहे. त्याचा मित्र उमेश याला एक महिन्याची शिक्षा झाली आहे. या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून आर. ए. बारावली यांनी काम पाहिले.









