प्रतिनिधी / सातारा :
खटाव तालुक्यातील विसापूर येथील हणंमत भाऊ निकम (वय 58), कमल हणमंत निकम (वय 65) यांचा उशीने गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार दि. 9 रोजी रात्री घडला होता. ते दोन्ही खून कमल यांच्या बहिणीचा जावई सतीश शेवाळे (रा. शनिवार पेठ सातारा) व त्याचा साथीदार सखाराम मदने (रा. पार्ले, ता. कराड) यांनी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्य संशयित आरोपी सतीश शेवाळे हा कर्जबाजारी होता. नोकरीही गेली होती. त्यातून आलेल्या नैराशेतून सुटका मिळवण्यासाठी त्याने मावस सासूसासऱ्यालाच संपवले. त्यांच्याकडेच दागिने घेवून दोघांनी तेथून पळ काढला. त्याने सोने कुठे विकले, याचा शोध आम्ही घेत आहोत, असेही बन्सल यांनी सांगितले.
आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बन्सल म्हणाले, पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विसापूर येथे दि. 9 रोजी रात्री बिकट घटना घडली होती. तेथील वृद्ध हणमंत निकम यांचा एका खोलीत तर त्यांच्या पत्नी कमल निकम यांचा दुसऱ्या खोलीत मृतदेह आढळून आला होता. आम्ही पथकासह घटनास्थळी रात्रीच भेट दिली. दोन संशयितांना अटक केली. सतीश शेवाळे हा खून झालेल्या दाम्पत्याचा नातेवाईक आहे. त्यानेच कट रचला असल्याची पोलिसांकडे त्याने कबुली दिली आहे. दि. 8 रोजी सतीश शेवाळे व त्याचा जोडीदार सखाराम मदने हे दोघे निकम यांच्याकडे गेले होते. दोघांनी निकम दाम्पत्य जेवण करेपर्यंत त्यांच्याशी बोलत बसले. जेवणानंतर हणंमत निकम हे वेगळ्या खोलीत तर कमल निकम या वेगळ्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या. त्याचवेळी सतीश व सखाराम यांनी हणमंत निकम यांच्याकडे विचारणा करण्याच्या निमित्ताने गेले अन् दोघांनी त्यांचा उशीने तोंड दाबून, गळा आवळून खून केला. त्यानंतर त्या दोघांनी बाजूच्याच खोलीत झोपलेल्या कमल यांच्याकडे त्या दोघांनी मोर्चा वळवला. त्यांच्याही उशीने त्यांचेही तोंड दाबून खून केला. त्यांच्या अंगावर असलेले मंगळसुत्र सोडून सहा तोळे दागिने काढून घेतले अन् दोघांनी तेथून कराड गाठले.
पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस तेथे पोहचले. पथकाने सर्व बाजूने चौकशी केली. सतीश शेवाळे यालाही दोन वेळा चौकशीकरता बोलवण्यात आले होते. त्याने वेगळीच माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, तांत्रिक बाबीच्या आधारे सतीश शेवाळे याच्याकडे संशयाची सुई वळल्याने त्याची माहिती घेतली असता तो दि. 26 रोजी गौरीशंकर नॉलेज सिटीच्या परिसरात दुपारी एकटाच आत्महत्या करण्याच्या उद्देशाने फिरत असताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी पकडताच सतीश शेवाळे याने ढसाढसा अश्रू काढले अन् गुह्याची कबुली दिली.
मावस सासूच्या गळयातील सोन्यामुळे खुनाचा कट शिजला
सतीश शेवाळे या सातारा तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत नोकरी करत होता. कोरोना काळात त्याची नोकरी गेली. त्यातच काढलेल्या कर्जाचे हप्ते थकले होते. कर्ज कसे फेडायचे या विचाराने दिवसेंदिवस तो वैफल्यग्रस्त झाला होता. त्याने त्याची मावस सासू कमल निकम हिच्याकडे जास्त सोने असल्याने तिचा खून करुन ते सोने विकून आपले कर्ज भागवण्याचा कट आखला. परंतु खून केल्यानंतर पोलिसांनी दोन वेळा चौकशीला बोलवल्यावर त्याच्यावर पोलिसांचे नजर असल्याने आपले बिंग फुटल्याची बाब त्याच्या मनात घोळु लागल्याने त्याने पुन्हा आत्महत्या करुन काढलेल्या विमा पॉलिसीतून किमान कुटुंबियांना तरी फायदा होईल या उद्देशाने तो आत्महत्या करण्यासाठी गेला होता. आत्महत्या करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यास पकडले.
सोने कुठे विकले याचीही होणार चौकशी
खून केल्यानंतर सतीश शेवाळे व त्याच्या जोडीदाराने सोने नेवून कुठे विकले. कुठे ठेवले याचा शोध सुरु आहे. त्यांच्या या कटात आणखी कोण होते काय याचाही पोलीस शोध घेत आहेत, असेही बन्सल यांनी सांगितले.
हेही वाचा : उघड्यावर कचरा टाकल्यास होणार कारवाई; हॉटेल्स, चायनिज गाडे मालकांना नोटीसा









