शिरडीहून परतणाऱ्या चालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने अपघात

फोंडा : शिरडी येथे साईबाबांचे दर्शन करून घरी परतत असताना धडेर, म्हापा-पंचवाडी येथे झालेल्या कारच्या स्वयंअपघातात मावसभाऊ व बहिणीचा मृत्यू झाला. सिद्धम महादेव नाईक (वय 11, शिरोडा), रेशम राजेंद्र नाईक (वय 18, रिवण सांगे) अशी मृतांची नावे असून कारगाडीतील अन्य पाचजण जखमी झाले आहेत. अपघाताची घटना काल सोमवारी दुपारी 11 वा. सुमारास घडली. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव नाईक हे आपले कुटुंबीय व रिवण येथील मेहुणे कुटुंबीय मिळून एकूण सातजणांसह सेलेरियो क्र. जीए 05 डी 8717 या कारने शिरडी येथे साईबाबा दर्शनासाठी गेले होते. रविवारी रात्री घरी पोहोचण्यास खूप उशीर झाला. त्यामुळे रात्रीच रिवणला न जाता सर्वजण महादेव नाईक यांच्या शिरोड्यातील घरी राहिले.
वाहनावरील ताबा गेल्याने अपघात
दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी मेहुणी व तिच्या मुलांना रिवण येथील घरी पोचविण्यासाठी सर्वजण कारने जात असताना धडेर, म्हापा-पंचवाडी येथे महादेव यांचा वाहनावरील ताबा गेल्याने कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. यावेळी पुढे बसलेला महादेव यांचा मुलगा सिद्धम हा जागीच ठार झाला. अन्य जखमींना हॉस्पिसिओ व बांबोळी येथे हलविण्यात आले होते. गंभीर जखमी झालेली रेशम राजेंद्र नाईक हिचा बांबोळी येथे उपचार घेत असताना दुपारी मृत्यू झाला. सिद्धम हा इयत्ता सहावीत शिकत होता तर रेशम ही कॉलेजची विद्यार्थिनी होती.
पाचजण जखमी
महादेव नाईक (48, शिरोडा), त्यांची पत्नी पूर्वा महादेव नाईक (47), सौम्य महादेव नाईक (7), राधिका राजेंद्र नाईक (52, रिवण), रोहिणी नाईक (22, रिवण) अशी जखमींची नावे आहेत. काहींना उपचारासाठी मडगांव येथील हॉस्पिसिओ व बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्यात आले आहे. फोंडा पोलिसस्थानकाच्या महिला उपनिरीक्षक रश्मी भाईडकर या पुढील तपास करीत आहेत.









