कंग्राळी बुद्रुक येथील घटना : दोघांना अटक, संशयितांची हिंडलगा कारागृहात रवानगी
प्रतिनिधी /बेळगाव
सासू व पोटच्या मुलांवर चाकूहल्ला करणाऱया युवकाचाही खून झाला आहे. गुरुवारी रात्री कंग्राळी बुद्रुक येथे ही घटना घडली असून याप्रकरणी काकती पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून कौटुंबिक कारणातून ही घटना घडली आहे.
दीपक पांडुरंग वाके (वय 42, रा. हनुमाननगर) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री कौटुंबिक वादातून दीपकने कंग्राळी बुद्रुक येथील आपली सासू यल्लुबाई हुरूडे (वय 68), मुलगा दिनेश (वय 15), मुलगी दीया (वय 12) यांच्यावर चाकूहल्ला केला होता. पत्नी दीपासह संपूर्ण कुटुंबीयांना संपविण्याचा त्याचा डाव होता.
गॅस सिलिंडर पेटवून घर उडविण्याचा प्रयत्न झाला. यावेळी आरडाओरड झाली. खून झालेल्या दीपकची पत्नी दीपा ही घरी नव्हती. तिचे चुलत भाऊ चेतन लक्ष्मण हुरूडे (वय 24) व सुशांत लक्ष्मण हुरूडे (वय 26, दोघेही रा. गणेश चौक, कंग्राळी बुद्रुक) हे आपल्या नातेवाईकांच्या मदतीला धावले. यावेळी झालेल्या झटापटीत दीपकही जखमी झाला.
जखमी दीपकला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. काकती पोलिसांनी चेतन व सुशांत या दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
जखमीचा मृत्यू…
खून झालेला दीपक व त्याची पत्नी दीपा यांच्यात कौटुंबिक वाद होते. त्यामुळे आपल्या दोन मुलांसमवेत कंग्राळी बुद्रुक येथील आपल्या माहेरी ती राहत होती. गुरुवारी रात्री ऑटोरिक्षातून सासरी आलेल्या दीपकने सासू व मुलांवर चाकूहल्ला केला. घरातील टीव्ही फोडली. कपडे व अंथरुणावर पेट्रोल ओतून पेटविण्यात आले. यावेळी दगडाने झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या दीपकचाही मृत्यू झाला आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.









