गॅरंटी’तील 2 हजार रु. सुनेला मिळण्याची शक्यता कमी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने पाच गॅरंटी योजना जारी करण्याची ग्वाही दिली आहे. पाच गॅरंटी योजनांमधील प्रमुख योजना असलेल्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेंतर्गत कुटुंबातील मुख्य गृहिणीला दरमहा 2 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. योजनेत लाभार्थी सासू की सून?, हे निश्चित करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. मात्र, सासूलाच ‘गृहलक्ष्मी’चा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत गृहलक्ष्मी योजना जारी करण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली होती. यासंबंधीचा अधिकृत आदेशही जारी करण्यात आला होता. योजनेची मार्गदर्शक तत्वे आणि अटी पुढील मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित केल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले होते.
सरकारने गॅरंटी योजनांसाठी अटी लागू केल्या जातील, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे गृहलक्ष्मी योजनेसाठी कोणकोणत्या अटी लागू केल्या जातील?, कोणाकोणाला या योजनेचा लाभ मिळेल?, अशी उत्सुकता राज्यभरात आहे. दरम्यान, महिलांना गृहलक्ष्मी योजनेतून 2 हजार रुपये देण्यासाठी लाभार्थी ठरविणे महाकठीण काम आहे. कारण अविभक्त (एकत्र) कुटुंबात 2 हजार रु. सासूला द्यावेत की सूनेला?, असा प्रश्न उद्भवला आहे.
गृहलक्ष्मी योजना
राज्यात 1.2 कोटी बीपीएल कुटुंबे आहेत. त्यांच्यासाठीच पाचही गॅरंटी योजना राबवली तरी वर्षाला दीड लाख कोटी रुपयांची गरज भासेल. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत महिन्याला 2 हजार रुपये गृहिणीच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. राज्यात 2.64 कोटी महिला मतदार असून त्यापैकी 1.28 कोटी बीपीएल कार्डधारक आहेत. या सर्वांना महिन्याला 2 हजार दिले तर किमान 20 हजार कोटी आवश्यक आहेत.
गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीची तयारी, योजनेचा लाभ कोणाला द्यावा, याबाबतच्या मार्गदर्शक तत्वे आणि सूचनांबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. गॅरंटी योजना जारी केल्याने सरकारवर किती आर्थिक भार पडेल, याचीही माहिती बैठकीत घेण्यात आली होती. बुधवारी महिला आणि बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे.
परंपरेनुसार मुख्य गृहिणी सासूच : हेब्बाळकर
मंगळवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना महिला आणि बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, गृहलक्ष्मी योजना अत्यंत सोप्या पद्धतीने राबविण्याचा विचार आहे. आपल्या परंपरेनुसार मुख्य गृहिणी सासूच आहे. त्यामुळे गृहलक्ष्मी योजनेची रक्कम सासूलाच देण्यात येईल, असे सांगितले. तसेच यासंबंधी बुधवारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून योजनेच्या अंमलबजावणीविषयी माहिती जमा करण्यात येईल. बैठकीत कोणते निकष ठरविले जातील. याविषयी आताच सांगणे कठीण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मंत्री हेब्बाळकर यांनी गृहलक्ष्मी योजनेची रक्कम सूनेला मिळणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत.









