सातारा :
मुळीकवाडी (ता. सातारा) येथील मुलीने प्रेमविवाह केल्याच्या कारणातून तिच्या आईने विषप्राशन केले. संगीता दत्तात्रय मुळीक (वय 45, रा. मुळीकवाडी ता. सातारा) असे आईचे नाव आहे. तिच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुळीकवाडी येथे राहात असलेली अपुर्वा दत्तात्रय मुळीक (वय 19) हिने तिच्या गावातील किरण निकम या युवकाबरोबर एक वर्षापूर्वी रजिस्टर लग्न केले होते. लग्नानंतर ती माहेरीच राहात होती. लग्नाला एक वर्ष होताच, दोन दिवसांपूर्वी ती बेपत्ता झाली. यामुळे तिची आई संगीता हिला मानसिक धक्का बसला. ती नैराश्यात गेल्याने तिने विष प्राशन केले. तिला तात्काळ खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक होती. अपुर्वा ही सातारा तालुका पोलीस ठाण्यात गेली. तिने पोलिसांना घडलेली घटना सांगून लग्न केल्याचे सर्टिफिकेट दाखवले. पोलिसांनी तिच्या भावाला फोन करून बहिणीने लग्न केल्याचे सांगितले. परंतु आईने विष प्राशन केल्याचे सांगताच अपुर्वाला धक्का बसला. मंगळवारी उपचारादरम्यान संगीताचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.








