रायबाग तालुक्यातील चिंचलीतील घटना : पतीशी झालेल्या भांडणानंतर उचलले टोकाचे पाऊल
वार्ताहर/कुडची
जन्मदात्या आईने आपल्या तीन मुलांसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचली (ता. रायबाग) येथे बुधवार, 5 मार्च रोजी उघडकीस आली. पतीशी झालेल्या भांडणानंतर महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. कुडची पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. शारदा अशोक ढाले (वय 38), अमृता अशोक ढाले (वय 14), अनुषा अशोक ढाले (वय 10) व आदर्श अशोक ढाले (वय 8) अशी मृतांची नावे आहेत. माता-मुलांच्या मृत्यूमुळे चिंचली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अशोक ढाले याचे पंधरा वर्षांपूर्वी रायबाग तालुक्यातील हालशिरगूर येथील शारदा हिच्याशी लग्न झाले होते. चिंचली येथे राहत असलेल्या या दाम्पत्यात नेहमी भांडण होत होते. पत्नी शारदा हिने काही महिला संघांतून पैसे घेतले होते. ते परत करण्यावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडल्यानंतर ती देवस्थानात राहत होती. या भांडणातूनच तिने बुधवारी सकाळी चिंचलीजवळ असलेल्या कृष्णा नदीत तीन मुलांसह उडी घेतली. याचदरम्यान बचावलेली मोठी मुलगी अमृता हिने नदीकाठावर येऊन आरडाओरडा केला. तिचे रडणे आणि आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली.
तिने आपली आई व भाऊ-बहीण येथेच पाण्यात पडल्याचे सांगितले. स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. बुडताना बाहेर आलेल्या अमृताला उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी दवाखान्याला नेताना वाटेत तिचा मृत्यू झाला. तर स्थानिक नागरिक, पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत शोधमोहीम राबविली. बचावकार्यावेळी लहान मुलगा आदर्श याला बाहेर काढले असता त्याचा श्वास सुरू होता. मात्र, उपचाराला हलवत असताना त्याचाही मृत्यू झाला. यानंतर अन्य दोन्ही मृतदेह अग्निशमन दलाचे जवान व स्थानिकांनी बाहेर काढले.
घटनास्थळी चिंचलीतील लोकांनी गर्दी केली होती. चारही मृतदेह कुडची येथील सरकारी दवाखान्यात आणून शवविच्छेदन केले. सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. संध्याकाळी उशिरा चिंचली येथे चौघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. कुडची पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रीतम नाईक, हारुगेरीचे मंडल पोलीस निरीक्षक रत्नकुमार जिरगीहाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. अशोक ढाले गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होता, असे सांगण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढत जाऊन पत्नीने हे कृत्य केल्याचे समजते.









