बळ्ळारी जिल्ह्यातील घटना : पती पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव : तीन मुलांसह शेततळ्यात उडी घेऊन मातेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बळ्ळारी जिल्ह्याच्या कुरुगोडू तालुक्यातील दम्मूर येथे घडली आहे. सिद्धव्वा (वय 30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिचे माहेर गडहिंग्लज तालुक्यातील हसूरचंपू येथे आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक चौकशीसाठी पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे. मेंढपाळ कुटुंबातील संजय (वय 32) हा पत्नी सिद्धव्वा आणि मुलांसह बळ्ळारीत आला होता. सिद्धव्वा मंगळवारी आपल्या तीन मुलांसह बेपत्ता झाली होती.
बुधवारी सकाळी तिचा मृतदेह बळ्ळारी जिल्ह्यातील दम्मूर येथील एका शेततळ्यात आढळून आला. स्थानिकांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. अभिज्ञा (वय 7), अवनी (वय 5) आणि आर्य (वय 3) अशी मृत मुलांची नावे आहेत. त्यांच्यावर गुरुवारी हसूरचंपू येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दहा वर्षांपूर्वी सिद्धव्वाचा विवाह बेळगाव जिल्ह्यातील होसूर येथील संजय याच्याशी झाला होता. पतीच्या छळाला कंटाळून सिद्धव्वाने आत्महत्या केल्याची तक्रार तिची आई रेणूका हिने दिली आहे. अधिक चौकशीसाठी संजयला ताब्यात घेतल्याची माहिती कुरुगोडू पोलीस स्थानकाचे मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ हिरेगौडर यांनी दिली आहे.









