प्रतिनिधी / बेळगाव
शाळेत नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या आपल्या मुलाला किडणी देवून त्याला जीवदान दिलेल्या मातेला पुढील उपचारासाठी अर्थसहाय्याची गरज आहे. यासाठी त्या मातेने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अथणी तालुक्यातील मदभांवी येथील प्रज्वल महादेवी निवलगी हा इयत्ता नववीमध्ये शिकतो. त्याची आई शोभा दोन महिन्याच्या गर्भवती असतानाच पतीचे निधन झाले. जुलै 18 मध्ये प्रज्वलला मिरज येथे दाखविण्यात आल्यामुळे त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर प्रज्वलला डॉ. प्रभाकर कोरे चॅरिटेबल हॉस्पिटल येथे पिडीअॅट्रीक नेफ्रॉलॉजी विभागात दाखविण्यात आले. मुलगा आणि आई यांचा रक्तगट एकच असल्याने आईने मुलाच किडणी देण्याची तयारी दर्शविली व 9 मार्च रोजी पीडीअॅट्रीक नेफ्रॉलॉजीस्ट डॉ. महांतेश पाटील यांनी प्रज्वलवर किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. त्यांना न्युरॉलॉजीस्ट डॉ. आर. बी. नेर्ली, डॉ. विक्रम प्रभा, भूलतज्ञ डॉ. राजेश माने, हृदयरोगतज्ञ डॉ. रिचर्ड सालढाणा यांचे सहकार्य लाभले.
जेएनएमसीच्या प्राचार्या डॉ. एन. एस. महांतशेट्टी यांच्या पुढाकाराने प्रज्वलला मोफत हेमोडायलेसीस व औषधे देण्यात येत आहे. परंतु त्याच्या एकूण उपचाराचा खर्च 5 ते 7 लाख रुपये असून त्यासाठी अर्जसहाय्य करावे, असे आवाहन शोभा यांनी केले आहे. इच्छुकांनी आपले अर्थसहाय्य शोभा महादेव निवलगी केव्हीजी बँक खाते क्रमांक 17217089504, आयएफएससी कोड केव्हीजी बी0002007 येथे जमा करावी.









