चिपळूण :
पुणे येथून चिपळूणला येत असताना कुंभार्ली घाटातील काळकडा येथील अवघड वळणावरून कार 500 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात माय–लेकाचा मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी रविवारी रात्री घडली. मात्र मंगळवारी दुपारी मोबाईल लोकेशनमुळे हा अपघात उघडकीस आला. सायंकाळी उशिरा क्रेनच्या माध्यमातून मृतदेहांसह कार बाहेर काढण्यात आली.
सुरेखा जगदीश खेडेकर (70), विश्वजित जगदीश खेडेकर (40, दोघेही कुंभार्ली–गणेशवाडी, सध्या पुणे) अशी दोघा मृतांची नावे आहेत. यातील सुरेखा या येथील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे यांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत. लब्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडेकर कुटुंबिय पुणे येथून रविवारी टाटा सफारी गाडीतून रत्नागिरीला कामानिमित्त निघाले. याचवेळी वाटेत विश्वजितने आपल्या पत्नीला सातारा येथे माहेरी सोडून तो आईला घेऊन चिपळूणकडे निघाला. वाटेत रात्री पाटणजवळ जेवणही केले. विश्वजितच्या पत्नीने या दोघांनाही वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र विश्वजितचा मोबाईल बंद होता, तर सासू सुरेखा यांच्या मोबाईलची रिंग वाजत होती. त्यामुळे त्यांनी मंगळवारी आपणाला संपर्क साधून विचारणा केली. मात्र इकडे कुणी आले नसल्याचे सांगितले. यानंतर आपण अलोरे–शिरगांव पोलीस ठाणेत जाऊन याची माहिती दिली.
यावेळी पोलिसानी दोघांचेही मोबाईल लोकेशन तपासले असता ते कुंभार्ली घाटात आढळून आले. त्यानंतर पोलीस, ग्रामस्थांसमवेत घाटात येऊ पाहणी सुरू केली. याचवेळी काळाकडा येथून कार घसरत गेल्याचे दिसून आल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी 500 फूट दरीत कार सापडली. त्यामध्ये दोघेही मृतावस्थेत आढळले. रात्री क्रेनच्या माध्यमातून दोन्ही मृतदेहांसह कार दरीतून बाहेर काढण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमानेंसह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
- सहा महिन्यांपूर्वीच वडिलांचे निधन
विश्वजित खेडेकर यांच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर खेडेकर कुटुंबाला हा मोठा धक्का बसला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची तपशीलवार माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.








