मिरज :
शासकीय रुग्णालयात मुतखड्याच्या उपचारासाठी गेलेल्या तरुणीने केस पेपरवर ‘प्रदीप’ नामक तरुणाच्या नावाचा उल्लेख केल्याने नात्यातील एकाने माय-लेकावर हल्ला करुन जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वड्डी येथे घडली. याप्रकरणी संगिता सुभाष नाईक (वय ३५) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयीत कुलदीप अशोक नाईक (वय ३५) याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सदर घटनेनंतर पोलिसांनी कुलदीपच्या घरी झाडाझडती घेतली असता, काही हत्यारेही मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संगिता नाईक व संशयित कुलदीप नाईक हे एकमेकांचे नातेवाईक असून, वड्डी गावात राहण्यास आहेत. कुलदीप हा संगिता यांच्या घरी गेला होता. अक्का, तू आकाश व मामा असे सर्वजण माझ्या घरी या असे त्याने सांगितले होते. त्यानुसार संगिता या मुलगा आकाश व मुलीला घेऊन गेल्या होत्या. त्यानंतर मुलीला मुतखड्याचा त्रास जाणवू लागल्याने तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते. तेथे केसपेपर काढत असताना संबंधीत मुलीने केस पेपरवर स्वतःच्या नावासमोर प्रदीप अशा नावाचा उल्लेख केला होता.
केस पेपरवर सदर नांव बघितल्यानंतर संशयित कुलदीप याला राग आला. कोण हा प्रदीप, असे म्हणत त्याने गावाकडे जावून संगिता यांना जाब विचारला. त्यानंतर घरातून लोखंडी दांडपट्टा आणून संगिता यांच्यासह त्यांचा मुलगा आकाश अशा दोघांना जबर मारहाण केली. आकाश याच्या डोक्यात व हातावर दांडपट्टा लागला आहे. तर संगिता यांच्याही हातावर वार झाले आहेत.








