प्रतिनिधी,कोल्हापूर
कळंबा मध्यवर्ती कारागृहात शितपेयाच्या रिकाम्या बाटलीतून मोबाईल आणि गांजा फेकणाऱ्या मायलेकरांना कळंबा कारागृहाच्या सुरक्षारक्षकांनी जेरबंद केले. रविवारी (दि. 7) सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. कोमल सुनील भोरे (वय 38, रा. राजेंद्रनगर) व तिचा अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 235 ग्रॅम गांजा, मोबाईल, जप्त करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी, कारागृहाच्या पूर्व बाजूला तटबंदीजवळ असणाऱ्या वॉचटॉवर क्रमांक 3 जवळ तुरुंगरक्षक अरुण सतिश बाबर कर्तव्यास होते. त्यांना 7 वाजण्याच्या सुमारास एक संशयित महिला व अल्पवयीन मुलगा बराचवेळ तटबंदीजवळ घुटमळत असल्याचे दिसले. बाबर यांनी महिलेच्या संशयास्पद हालचाली हेरल्या. ते तातडीने कारागृहाबाहेर तटबंदीजवळ गेले. त्याचवेळी भिंतीवरून बाटली आत फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला आणि तिच्या मुलाला रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून बाटलीतून 235 ग्रॅम गांजा, एक मोबाइल आणि पांढऱ्या रंगाचा अंमली पदार्थ मिळाला. जप्त केलेल्या मुद्देमालासह महिलेला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अल्पवयीन मुलाची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास जुना राजवाडा पोलिसांकडून सुरु आहे.
Previous Articleप्रियेसीला भेटायला गेलेल्या प्रियकरचा विहीरीत पडून मृत्यू
Next Article पंचवीस वर्षात झालं नाही ते पाच वर्षात होणार का?









