अल्पवयीन मुलाला बाल न्यायमंडळीसमोर केले हजर
बेळगाव : लक्ष्मीनगर-हिंडलगा येथील महिलेच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मायलेकीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असून या प्रकरणी अल्पवयीन मुलाला बाल न्यायमंडळीसमोर हजर करण्यात आले आहे. गेल्या सोमवार दि. 21 एप्रिल रोजी रात्री गणेश रेसिडेन्सी, लक्ष्मीनगर-हिंडलगा येथील अंजना अजित दड्डीकर (वय 52) या महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले होते. यासंबंधी खून झालेल्या अंजनाच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघा जणांना अटक केली आहे. ज्योती बांदेकर (वय 46), मुलगी सुहानी बांदेकर (वय 19) दोघीही राहणार गणेशपूर यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.









