जत :
जत तालुक्यातील बेळोंडगी येथे एक हृदयद्रावक घटना घडली. खेळता-खेळता शेततलावात पडलेल्या २ वर्षांच्या चिमुकलीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या आईचाही बुडून मृत्यू झाला.
मृतांमध्ये कावेरी आनंद संबर्गी (वय २०), लक्ष्मी आनंद संबर्गी (वय २) या मायलेकींचा समावेश आहे. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास, घराशेजारी असलेल्या अशोक मलकाप्पा संबर्गी यांच्या शेततलावात लक्ष्मी चुकून पडली. तिला वाचवण्यासाठी धावलेल्या कावेरीला पोहता न आल्याने दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, तसेच पोलीस उपनिरीक्षक दिनेश दसाडे यांनी घटनास्थळी भेट देत दोघांचे मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदन करून पुढील तपास पोउनि दिनेश दसाडे करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








