पुणे / वार्ताहर :
डांबरमिश्रीत खडी भरून जाणाऱ्या ट्रकने अचानक वळण घेत दुचाकीस्वार महिलेसह तिच्या आठ वर्षीय मुलीला चिरडले होते. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या मायलेकींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी बिबवेवाडी जंक्शन सिग्नलजवळ हा अपघात झाला होता.
रूपाली कल्पेश बोरा (वय 38) आणि गरिमा कल्पेश बोरा (8, रा. सुपार्श्वनाथ सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) अशी ठार झालेल्या मायलेकींची नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक राहूल कुंडलिक जाधव (32 रा. आंबेगाव पठार, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली आणि त्यांची मुलगी गरिमा 15 फेब्रुवारीला संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी चालल्या होत्या. त्यावेळी बिबवेवाडी जंक्शन सिग्नलजवळ अचानकपणे डांबरमिश्रीत खडी वाहून नेणाऱ्या ट्रकचालकाने वळण घेतले. त्यामुळे दुचाकीवरील मायलेकी ट्रकखाली चिरडून गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिरसट तपास करीत आहेत.









