अल मुहाजिर याचा अनेक देशांमधील हल्ल्यात सहभाग
वृत्तसंस्था/ काबूल
जगातील सर्वात वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक आणि दाएश खोरासानचा नेता शहाब अल-मुहाजिर अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात मारला गेला. अल मुहाजिरला सनाउल्लाह गफारी या नावानेही ओळखले जात होते. जगभरातील अनेक देशांमधील दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग यापूर्वीच उघड झाला होता. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील रहिवासी असलेला अल मुहाजिर उर्फ गफारी हा पाकिस्तान, इराण, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानसह अनेक देशांमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मोस्ट वॉन्टेड’ होता. संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि युरोपियन युनियनने डिसेंबर 2021 मध्ये अल-मुहाजिरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. याशिवाय त्याच्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीला 10 मिलियन डॉलरचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
अल मुहाजिर हा एप्रिल 2020 पासून दाएश खोरासानचे नेतृत्व करत होता. पाकिस्तान आणि जगातील इतर देशांमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि ऑपरेशन लीडर म्हणून त्याचे नाव आघाडीवर होते. तसेच काबूलमधील पाकिस्तानच्या दुतावासावरील हल्ला आणि पेशावरच्या किसा ख्वानी बाजारातील इमाम बारगाह उद्ध्वस्त करण्यात त्याचा हात होता. याशिवाय, तो अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात तुऊंग फोडण्यात तसेच उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये रॉकेट हल्ल्यांमध्येही सहभागी होता. तसेच संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये सर्व आयएसआयएसचे जाळे व्यापक बनवण्यात आणि निधीची व्यवस्था करण्यातही तोच मुख्य भूमिका बजावत होता.