एनसीआरबीच्या अहवालाचा निष्कर्ष
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ओव्हर-स्पीडिंगमुळे देशातील तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात ओव्हर-स्पीडिंगमुळे हाणाऱया एकूण मृत्यूंपैकी 59.7 टक्के मृत्यू केवळ या दोन राज्यांमध्ये झाले आहेत. एनसीआरबी अहवालानुसार देशात 2021 मध्ये एकूण 4,03,116 रस्ते दुर्घटना झाल्या असून यातील 2,40,828 दुर्घटना ओव्हर-स्पीडिंग आणि ओव्हरटेकिंगमुळे झाल्या आहेत.
अधिक वेगामुळे होणाऱया रस्ते दुर्घटनांमधील सर्वाधिक 11,419 मृत्यू तामिळनाडूत झाले आहेत. तर कर्नाटकात ओव्हर-स्पीडिंगमुळे 8,797 लोकांनी जीव गमावला आहे. कर्नाटकात मागील वर्षी एकूण 34,647 दुर्घटना झाल्या असून यात 40,754 जण जखमी झाले तर 10,038 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात 2020 या साली 3,54,796 रस्ते दुर्घटनांची नोंद झाली होती. 2021 मध्ये हा आकडा वाढून 4,03,116 वर पोहोचला आहे. याचदरम्यान मृत्यूदरात 16.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2020 मध्ये रस्ते दुर्घटनांमध्ये 1,33,201 जणांचा बळी गेला होता. 2021 मध्ये हा आकडा 1,55,622 वर पोहोचला आहे. याचबरोबर प्रति हजार वाहनांमागील मृत्यूदर 2020 मध्ये 0.45 टक्के होता. 2021 मध्ये हे प्रमाण वाढून 0.53 टक्के झाले आहे.
भारतात नवे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग निर्माण केले जात आहेत. दुतगती मार्गावर वाहनचालक ड्रायव्हिंगच्या स्थितीबद्दल अनभिज्ञ असतात. विशेषकरून धुके आणि अधिक उष्णतेदरम्यान बाळगाव्या लागणाऱया खबरदारीची त्यांना माहिती नसते. बहुतांश वाहनमालक आणि चालक स्वतःच्या वाहनाची स्थिती आणि मर्यादा जाणून न घेताच द्रुतगती मार्गाला रॅली ट्रकच्या स्वरुपात वापर करू पाहत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.









