अवकाळी पावसाची हजेरी : नागरिकांची तारांबळ : ठिकठिकाणी झाडे-फांद्या तुटून पडल्या
वार्ताहर/किणये
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तालुक्यातील काही भागाला झोडपून काढले. सोमवारी दुपारपासून काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू झाली. सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेले होते. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी झाली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सोमवारी सकाळपासूनच उष्णतेमध्ये वाढ झाली होती. दुपारपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. बऱ्याच ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. फांद्या विद्युत तारांवर पडल्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तालुक्यात दि. 25 मार्च व 26 मार्च असे दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. गुढीपाडव्या दिवशी सायंकाळी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार सोमवारी बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मछे, पिरनवाडी, उद्यमबाग परिसरात सर्वाधिक पाऊस झाला. या भागातील रस्त्यांवर पाणी आले होते. किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, संतिबस्तवाड, वाघवडे, बामणवाडी, जानेवाडी बिजगर्णी, बेळगुंदी, बेळवट्टी, सोनोली, यळेबैल आदी भागात दमदार पाऊस झाला. काही शिवारात पाणी साचले होते.
गणेशपूर, बेनकनहळळी परिसरात जोरदार पाऊस
गणेशपूर, बेनकनहळ्ळी परिसरात जोरदार वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. गटारीतून पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्यामुळे पाणी रस्त्यावर आले होते.
कंग्राळी बुद्रुक परिसरात पावसाचा मारा
येथील परिसरात सोमवारी दुपारी दमदार पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र दिसून येत आहे. गेले चार दिवस 45 सेल्सिअस उष्णतेने कहर केला होता. अंगाची लाहीलाही होत होती. सोमवारी दुपारी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाली. पाऊस शेतीच्या मशागतीच्या कामाना उपयुक्त ठरणार आहे. एकंदर शेतकरी वर्गासाठी सदर पाऊस उपयुक्त असल्यामुळे शेतकरी आनंदीत झाल्याचे दिसून येत आहे.
मिरची, बीन्स, भेंडी पीक झाले आडवे
या पावसामुळे जोंधळा व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे मिरची, बीन्स, भेंडी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसापूर्वी झालेला पाऊस आणि सोमवारी झालेल्या पावसामुळे जोंधळ्याची कणसे पूर्णपणे खराब झाली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. या पिकांसाठी केलेला खर्च आता काढायचा कुठून याचीच चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.









