ब्राझील सरकारने दिली पुष्टी
वृत्तसंस्था /ब्राझिलिया
इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने हिजबुल्लाहकडुन ज्यूधर्मीयांवर हल्ला करण्याचा रचण्यात आलेला कट उधळून लावला आहे. लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने ब्राझीलमध्ये ज्यूधर्मीयांवर हल्ला करण्याचा कट रचला होता. ब्राझील पोलिसांनी हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना अटक करत हल्ल्याचा कट हाणून पाडला आहे. या कारवाईमागे मोसादची रणनीति कारणीभूत असल्याचे ब्राझील सरकारकडून सांगण्यात आले आहे.
ब्राझीलमध्ये हल्ल्याचा कट हिजबुल्लाहने रचला होता. हा कट मोसाद आणि अन्य आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्यातून हाणून पाडण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी मिनस गेरॅस, साओ पावलो आणि ब्राझिलिया समवेत अनेक ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे. ब्राझीलमध्ये ज्यू समुदायांच्या इमारतींना लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. याचबरोबर हिजबुल्लाहचे हस्तक दहशतवादी संघटनांमध्ये लोकांची भरती करण्याच्या प्रयत्नात होते.
ब्राझीलमध्ये स्थानिक सुरक्षा दलांसोबत मिळून ज्यू तसेच इस्रायलच्या ठिकाणांवरील हल्ल्याचा कट हाणून पाडण्याच्या मोहिमेत भाग घेतला. ही मोहीम यशस्वी ठरली आहे. हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी ब्राझीलच्या पोलिसांचे आभार मानत असल्याचे मोसादने म्हटले आहे. हिजबुल्लाह जगभरात इस्रायली, ज्यू आणि पाश्चिमात्य देशांच्या ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हिजबुल्लाहला याकरता इराणकडून पैसे मिळत आहे. हाच धोका पाहता आम्ही अशाप्रकारचे कट हाणून पाडण्यासाठी काम करत आहोत, असे मोसादकडून सांगण्यात आले.









