प्रतिनिधी/ बेळगाव
मोरया ग्रुपतर्फे वडगाव येथील मोरया मल्टिजिमचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अमित भाटे होते.
येळ्ळूर रोड येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मोरया मल्टिजिमचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, राष्ट्रीय अॅथलेटिक्सपटू श्रेया सुंठकर, आर्किटेक्चर अजित पाटील, राजू भातकांडे, मिलिंद बेळगावकर व इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते. महापौर मंगेश पवारांच्या हस्ते फित कापून जिमचे उद्घाटन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत मिलिंद बेळगावकर यांनी केले. यावेळी महापौर मंगेश पवार म्हणाले, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी वेगवेगळ्या व्यसनात अडकले आहेत. अशा विद्यार्थ्यांना बाहेर काढून शरीर सदृढ बनविण्यासाठी व्यायाम शाळा व जिमची गरज आहे. विद्यार्थ्यांनी नियमितपणे व्यायाम केल्यास आपले शरीर सदृढ बनते. याचा फायदा त्यांनी घ्यावा.
डॉ. अमित भाटे म्हणाले, सध्या विद्यार्थ्यांचे लक्ष फिटनेसकडे वळविले पाहिजे. कारण अनेक विद्यार्थ्यांच्या शरीर कमकुवत दिसत आहे. शरीरसौष्ठवपटूसुद्धा झटपट मोठे होण्यासाठी उत्तेजक द्रव सेवन करून मोठे होण्याचे पाहत आहेत. पण याचे दुष्परिणाम पुढे जाऊन बाहेर येतात. त्यामुळे योग्य त्या दिशेने जाऊन भरपूर व्यायाम करून आपले शरीर बळकट बनवावे, असे त्यांनी सांगितले.
या जिममध्ये अत्याधुनिक मशिनी आणण्यात आल्या असून त्यामुळे या मशीनींचा फायदा व्यायाम करणाऱ्या खेळाडूंना होणार आहे. पुरुष व महिलांसाठीही ही जिम उपलब्ध असणार आहे. या जिममध्ये प्रशिक्षित प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी जिमचे संस्थापक शेखर जाणवेकर, रेवती जाणवेकर, मंगलदास जाणवेकर, इंदिरा जाणवेकर, सुधीर पाटील, महेश कांबळेसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









