वृत्तसंस्था/ राऊरकेला
पुरुषांच्या हॉकी इंडिया लीगमधील सामन्यात स्कॉटिश फॉरवर्ड ली मॉर्टनने उशिराने नोंदवलेल्या गोलाच्या बळावर टीम गोनासिकाने सूरमा हॉकी क्लबचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
सामना संपण्यास केवळ एक मिनिट बाकी असताना मॉर्टनने निर्णायक गोल नोंदवला. त्याआधी निलम संजीप झेस 33 व्या मिनिटाला गोनासिकाचा पहिला गोल नोंदवला होता. सूरमा हॉकी क्लबचा एकमेव गोल 48 व्या मिनिटाला पवन राजभरने नोंदवला.
पूर्वार्ध गोलफलक कोराच राहिल्यानंतर निलम झेसने गोलकोंडी फोडत भारताचा पहिला गोल 33 व्या मिनिटाला नोंदवला. त्याने टॅप केलेला चेंडू सूरमाच्या डिफेंडरला लागून गोलपोस्टमध्ये गेला. चौथ्या व शेवटच्या सत्रात दोन गोलांची नोंद झाली. दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमण तेज केले होते. राजभरने सूरमाला 48 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. सर्कलच्या बाहेरून सहकाऱ्याने पुश केलेला चेंडू त्याने रिव्हर्स फटका मारत गोलच्या दिशेने वळविला. मात्र टीम गोनासिकाने अखेरच्या टप्प्यात गोल नोंदवत विजय साकार केला. मॉर्टनने सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना चेंडू स्कूप करीत सूरमाच्या गोलरक्षकाच्या वरून गोलपोस्टमध्ये मारत हा गोल केला.









