उपांत्य फेरी गाठत मोरोक्कोचे ऐतिहासिक यश, अन नेसिरीचा एकमेव गोल ठरला निर्णायक
वृत्तसंस्था/ दोहा
मोरोक्कोने ऐतिहासिक कामगिरी करताना विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकन संघ होण्याचा मान मिळविला असून येथे झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत बलाढय़ पोर्तुगालला एकमेव गोलने पराभवाचा धक्का देत त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. या पराभवामुळे क्रिस्टियानो रोनाल्डोचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही पुन्हा एकदा भंगले आहे.
युसेफ अन नेसिरीने 42 व्या मिनिटाला एकमेव विजयी गोल नोंदवत मोरोक्कोची या स्पर्धेतील स्वप्नवत घोडदौड पुढे चालू ठेवली. फुटबॉलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या 37 वर्षीय रोनाल्डोला सलग दुसऱया सामन्यात स्टार्टिंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. मात्र 51 व्या मिनिटाला त्याला बदली खेळाडू म्हणून उतरवण्यात आले आणि स्टॉपेज टाईममध्ये त्याने गोल करण्याची चांगली संधी गमावली. पाचवेळा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळविणाऱया रोनाल्डोला विश्वचषक जिंकण्याची किंवा अंतिम फेरी गाठण्याची स्वप्नपूर्ती होण्याआधीच कारकीर्द संपवावी लागणार आहे. सामना संपल्यानंतर तो टनेलमध्ये सावकाशपणे चालत जाताना त्याच्या डोळय़ात अश्रू आले होते. मोरोक्कोची उपांत्य लढत इंग्लंड किंवा फ्रान्स यापैकी एकाशी होईल.
आजवर विश्वचषक स्पर्धेत युरोपियन व दक्षिण अमेरिकन संघांनीच वर्चस्व गाजविले होते. पण यावेळी पहिल्यांदाच एका आफ्रिकन संघाने उपांत्य फेरी गाठत नवा इतिहास निर्माण केला. कॅमेरून (1990), सेनेगल (2002), घाना (2010) या आफ्रिकन देशांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्यापुढे त्यांना जाता आले नव्हते. फ्रान्समध्ये जन्मलेले वालिद रेग्रागुई मोरोक्को संघाचे प्रशिक्षक असून या संघात विदेशात जन्मलेल्या 14 खेळाडूंचा समावेश आहे. या संघाच्या यशाने अरब विश्व एकत्र आल्याचे दिसत आहे. संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहिल्यास त्यांच्याकडे आता जेतेपदाचे दावेदार म्हणूनही पाहिले जात आहे. बेल्जियम, क्रोएशिया यांचा समावेश असलेल्या गटात त्यांनी पहिले स्थान मिळविले तर दोन युरोपियन हेविवेट संघ स्पेन व आता पोर्तुगाल यांना धक्का दिला आहे.
मोरोक्कोचा बचाव इतका भक्कम आहे की, या स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत प्रतिस्पर्ध्यांना एकही गोल करू दिलेला नाही. त्यांनी प्रतिस्पर्ध्याला फक्त एकदा स्वयंगोल दिला आहे. पोर्तुगालने उपउपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा 6-1 अशा फरकाने धुव्वा उडविला होता, त्यांनाही मोरोक्कोने चकित केले. या सामन्यात त्यांनी प्रतिआक्रमण करण्यावर जास्त भर दिला होता आणि त्यापैकी एका प्रयत्नात त्यांना गोल नोंदवण्यात यश आले. डाव्या बगलेतून आलेल्या क्रॉसवर अन नेसिरीने पोर्तुगालचा गोलरक्षक दिएगो कोस्टा व डिफेंडर रुबेन डायस यांच्यामध्ये उंच उडी घेत हेडर मारत रिकाम्या नेटमध्ये चेंडू मारला.
2026 मधील स्पर्धा अमेरिका, मेक्सिको व कॅनडा येथे होणार असून त्यावेळपर्यंत रोनाल्डो 41 वर्षाचा झालेला असेल. त्यामुळे येथे तो 2006 नंतर दुसऱयांदा उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील होता. तो मैदानात उतरल्यानंतर त्याला चेंडूवर ताबा मिळणार नाही, याची मोरोक्कोने दक्षता घेतली. स्टॉपेज टाईममध्ये त्याला चेंडू मिळाला. पण त्याने मारलेला फटका मोरोक्कोचा गोलरक्षक यासिन बौनूने अचूक अडविल्याने त्याचा हा प्रयत्न वाया गेला. पोर्तुगालचा सेंटरबॅक पेपेने सहा यार्ड बॉक्समधून हेडर मारला, पण तो खूप वाईड गेल्याने पोर्तुगालची बरोबरी संधी वाया गेली. सामना संपल्यानंतर रोनाल्डो निराशेने गुडघ्यावर टेकून बसला आणि मैदान सोडताना त्याला अश्रू अनावर झाले होते. त्याचा समकालीन महान खेळाडू मेस्सी उपांत्य फेरीत खेळताना दिसेल तर रोनाल्डो मात्र मायदेशी परतलेला असेल.









