आठशेहून अधिक बळी : 6.8 रिश्टर स्केल तीव्रता : ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान, अनेक घरे-इमारती भूईसपाट
वृत्तसंस्था/ मॅराकेच
पश्चिम आफ्रिकेतील मोरोक्को देशात झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी पहाटे मोरोक्कोला भूकंपाचा मोठा धक्का बसला. भूकंपामुळे 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोरोक्कोमधील भूकंपाचा फटका मॅराकेच या ऐतिहासिक शहरालाही बसला असून तेथे अनेक ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाले आहे. देशाच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. मोरोक्कोमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 इतकी होती. मोठ्या भूकंपानंतर 19 मिनिटांनी 4.9 रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाल्यामुळे आणखी विध्वंस झाला.
मोरोक्कोच्या मॅराकेचच्या दक्षिण-पश्चिम भागात शनिवारी पहाटे झालेल्या या प्रलयंकारी भूकंपात 800 हून अधिक जणांचा बळी गेला असून अजूनही मृतांचा आकडा वाढत चालला आहे. सुरुवातीला दीडशे ते दोनशे लोक मरण पावल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, दिवसअखेरपर्यंत राबविण्यात आलेल्या मदत व बचावकार्याअंती मृतांचा आकडा 800 च्या पुढे पोहोचला आहे. खुद्द मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. याशिवाय अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनेही अधिकृत माहिती दिली. या भूकंपाचा केंद्रबिंदू मॅराकेचपासून 71 किमी अंतरावर 18.5 किमी खोलीवर होता. या नैसर्गिक आपत्तीत एटलस पर्वतातील गावांपासून ते मॅराकेच या ऐतिहासिक शहरापर्यंत बऱ्याच घरे-इमारतींचे नुकसान झाले. पाच प्रांतांना सर्वाधिक फटका बसला असून बचावकर्ते दुर्गम भागात पोहोचण्यासाठी संघर्ष करत असल्याने मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
भूकंपामुळे आतापर्यंत 800 जणांना जीव गमवावा लागल्याचे मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे. जखमींची संख्या 329 असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपात मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू 18.5 किमी खोलीवर होता. त्याचे स्थान मॅराकेच शहराच्या दक्षिण-पश्चिमेस अंदाजे 72 किमी आणि ओकामेडेन शहराच्या 56 किमी पश्चिमेस होते. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की संपूर्ण परिसर हादरला.
मॅराकेच शहराला भूकंपाचा मोठा फटका बसला आहे. येथे वीजपुरवठा खंडित झाला आहे. भूकंपाचा परिणाम इंटरनेट सेवांवरही दिसून येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नेटवर्क टॉवर बंद झाल्यामुळे इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की ते पोर्तुगाल आणि अल्जेरियापर्यंत जाणवले. मात्र, अन्य देशांमध्ये जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.
ऐतिहासिक वारसास्थळांना धक्का
मॅराकेचमध्ये 12 व्या शतकात बांधलेल्या प्रसिद्ध कौटुबिया मशिदीचे नुकसान झाले. तसेच मोरोक्कन लोकांनी युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ असलेल्या जुन्या शहराभोवती असलेल्या प्रसिद्ध लाल भिंतींच्या काही भागांचे नुकसान दर्शविणारे व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंनुसार, अऊंद रस्त्यावर ढिगारे पसरल्याचे दिसून येत आहेत. या तीव्र भूकंपानंतर देशाच्या काही भागात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आफ्रिकन आणि युरेशियन प्लेट्समधील स्थानामुळे, मोरोक्कोच्या उत्तरेकडील प्रदेश भूकंपाच्या छायेत येतो. 2004 मध्ये ईशान्य मोरोक्कोमधील अल होसीमाह येथे झालेल्या जोरदार भूकंपामुळे किमान 628 लोक ठार झाले आणि 926 जखमी झाले. याशिवाय 1980 मध्ये मोरोक्कोच्या शेजारी असलेल्या अल्जेरियामध्ये 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे 2,500 लोक ठार झाले होते.
भारतीय पंतप्रधानांसह जागतिक नेत्यांकडून शोक
मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे मला खूप दु:ख झाले आहे. या दु:खाच्या वेळी माझे विचार मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मोरोक्कोमधील भूकंपामुळे आपण दु:खी आहोत, असे संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे. त्यांनी सरकार आणि जनतेशी एकता व्यक्त केली आहे. भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले.