वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोरोक्कोचा माजी टेनिसपटू युनेस राचिदी याने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत विक्रमी 135 सामन्यात फिक्सिंग केल्याचा पराक्रम केल्याने त्याच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने आजीवन बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
टेनिस सामन्यामध्ये फिक्सिंग करण्याच्या प्रकरणात 36 वषीय राचिदी आणि दोन अल्जेरियन टेनिसपटूंचाही समावेश असल्याचे आढळून आले. या अल्जेरियन टेनिसपटूवरही आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने बंदी घातली आहे. राचिदीने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत यापूर्वी एटीपीच्या स्पर्धांमध्ये विक्रमी सामने खेळले आहेत. मोरोक्कोच्या राचिदीने आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या नियमांचे उल्लंघन केले असून त्याला 34 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंडही करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या या निर्णयामुळे राचिदीला यापुढे टेनिस संदर्भातील कोणत्याही कार्यक्रमात तसेच सराव प्रशिक्षण वर्गातही सहभागी होता येणार नाही.









