स्वच्छतेसह कचरा उचल कामाची केली पाहणी : शववाहिकेचीही घेतली माहिती
बेळगाव : नव्या ठेकेदारांकडून शहर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली असल्याने या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त शुभा बी. यांनी गुरुवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान शहरात फेरफटका मारून स्वच्छता आणि कचरा उचल कामाची पाहणी केली. तसेच कलमठ रोडवरील शववाहिनीची पाहणी करण्यासह रजिस्टरदेखील तपासले. अचानक मनपा आयुक्तांनी सकाळी शहरात पाहणी दौरा केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यापूर्वी बेळगाव शहरातील काही प्रभागातील स्वच्छतेचा ठेका ठेकेदारांकडे होता. तर उर्वरित प्रभागांमध्ये महापालिकेकडून स्वच्छता व कचऱ्याची उचल केली जात होती. पण आता बेंगळूर येथील गणेश शंकर या ठेकेदाराला शहरातील सर्व 58 प्रभागांच्या स्वच्छतेचा ठेका दिला आहे. 1 ऑगस्टपासून नवीन ठेकेदारांनी शहर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली आहे. सकाळी तसेच रात्रीच्यावेळीही बाजारपेठेतील कचऱ्याची उचल केली जात आहे.
नव्या ठेकेदारांनी कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी नवीन वाहने आणली आहेत. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे. त्यामुळे नवीन ठेकेदारांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आला आहे. कशा प्रकारे सकाळच्यावेळी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. तसेच कचऱ्याची वाहतूक व्यवस्थितरित्या केली जात आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस, रविवार पेठ, कलमठ रोड यासह विविध ठिकाणी सहाय्यक पर्यावरण अभियंते अदिलखान पठाण यांच्या उपस्थितीत पाहणी केली. त्यानंतर कलमठ रोडवर असलेल्या मनपाच्या शववाहिनीची पाहणी केली. वाहन चालूस्थितीत आहे की नाही, याबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच रजिस्टरची पाहणी केली. महापालिकेच्या शववाहिकेबाबत नागरिकांतून वारंवार तक्रारी येत असल्याने त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी शववाहिकेबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. उत्तर भागात पाहणी दौरा केल्यानंतर त्यांनी दक्षिण भागातदेखील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. अचानक मनपा आयुक्तांनी केलेल्या पाहणी दौऱ्यांमुळे मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.









