वृत्तसंस्था/ ऑकलंड
फेबुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱया आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी क्रिकेट न्यूझीलंडने आपल्या महिला संघासाठी दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्कल यांचा प्रशिक्षकवर्गात समावेश केला आहे.
ऑस्ट्रेलियात झालेल्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया नामिबिया संघाला मॉर्कल यांचे यापूर्वी मार्गदर्शन लाभले होते. आता न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाला मॉर्नी मॉर्कल यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार असल्याने त्याचा लाभ या संघाला होऊ शकेल. मॉर्नी मॉर्कल यांनी आपल्या 2006 ते 2018 या कालावधीतील वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 86 कसोटी, 117 वनडे आणि 44 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व करताना एकूण 544 गडी बाद केले आहेत. दक्षिण आफ्रिकेत होणाऱया महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघाची निवड शुक्रवारी करण्यात येणार आहे. न्यूझीलंडचा महिला संघ या स्पर्धेसाठी 23 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेला प्रयाण करेल.









