दुचाकीस्वारांचा भरणा अधिक : हेल्मेट परिधान करणे अत्यावश्यक
बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात वाहन अपघात व अपघातात होणारे मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. गेल्या चार वर्षांतील आकडेवारीवरून ही गोष्ट सामोरी आली आहे. चार वर्षात वाहन अपघातात 3 हजार 358 जणांचा बळी गेला आहे. तर साडेबारा हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. बेळगाव जिल्हा व शहर पोलिसांकडून उपलब्ध आकडेवारीनुसार ही माहिती उघडकीस आली आहे. वाहतूक नियम मोडणे, सुसाट वेग, नशेत वाहने चालविणे, ग्रामीण भागात रस्त्यांची दुर्दशा आदी अनेक कारणांमुळे अपघातांचा आलेख चढता आहे. याबरोबरच अल्पवयीन मुलांकडे वाहने देण्याचे प्रकारही वाढल्यामुळे साहजीकच अपघाताची संख्याही वाढत आहेत.
गेल्या वर्षी जिल्ह्यात 2,087 अपघात झाले असून यामध्ये 387 मोटारसायकलस्वारांसह 758 जणांचा बळी गेला आहे. तर साडेतीन हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत. बेळगाव शहर व उपनगरात गेल्या वर्षी 555 वाहन अपघातात 63 दुचाकीस्वारांसह 132 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 314 जण जखमी झाले आहेत. 2020 पासून चार वर्षांत बेळगावात 1 हजार 964 अपघात झाले आहेत. या अपघातात 203 दुचाकीस्वारांसह एकूण 522 जणांचा मृत्यू झाला असून 2024 जण जखमी झाले आहेत. तर जिल्ह्यात 7 हजार 323 अपघातात 1 हजार 429 दुचाकीस्वारांसह 2 हजार 836 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 हजार 433 जण जखमी झाले आहेत.
बेळगाव शहर व जिल्ह्यातील गेल्या चार वर्षांची आकडेवारी लक्षात घेता अपघातात दुचाकीस्वारांचेच अधिक बळी गेले आहेत. जर हेल्मेट परिधान केले असते तर यापैकी अनेकांचा जीव वाचला असता. कारण मृत्युमुखी पडलेल्यांना अधिकतर डोक्याला दुखापत झालेली आढळली. परिस्थितीत बदल करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने हेल्मेट सक्तीसंबंधी जागृतीची मोहीम राबविली जाते. दंडात्मक कारवाईही केली जाते. तरीही परिस्थितीत म्हणावी तशी सुधारणा होताना दिसत नाही. ‘आम्ही दंड लावतो म्हणून तुम्ही हेल्मेट परिधान करू नका. प्रत्येकाचा जीव हा अनमोल आहे. जीवितहानी टाळण्यासाठी हेल्मेट परिधान करूनच दुचाकी चालवा’ यासाठी बेळगाव शहर व जिल्हा पोलिसांकडून जागृती अभियान राबविण्यात येत असून अनेक ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांकडून मोटारसायकल रॅलीही आयोजित करण्यात आल्या आहेत.









