वृत्तसंस्था/प्रयागराज
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील 45 दिवसांच्या महाकुंभमेळ्याच्या चौथ्या दिवशीपर्यंत तब्बल 7 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. तिसऱ्या शाही स्नानापर्यंत 10 कोटींहून अधिक भाविक प्रयागराजला पोहोचतील असा विश्वास आहे. संगमावर स्नान करण्यासाठी विदेशातील भाविकांचीही मोठी उपस्थिती दिसत असून परदेशी शिष्टमंडळ आखाड्यांमधील संतांचे दर्शनही घेत आहेत. विदेशी भक्तांच्या सहभागामुळे महाकुंभाचे जागतिक महत्त्व आणखी वाढले आहे.
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यात भाविकांची रीघ कायम आहे. 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने 3.5 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले. 16 जानेवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत महाकुंभात ‘संस्कृतीचा महाकुंभ’ चालणार आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान भाविकांना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती यांनी महाकुंभाच्या व्यवस्थेचे खूप कौतुक केले आहे.









