200 कोटी लोकांना पाण्याची टंचाई
1990 पासून जगातील निम्म्याहून अधिक मोठी सरोवरे आटली आहेत. केवळ सरोवरंच नाही तर अन्य मोठे जलस्रोत देखील वेगाने आटले आहेत. वाढते तापमान आणि हवामान बदलामुळे असे घडत आहे. यामुळे जगातील अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेती, जलविद्युत निर्मितीसाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे.
वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने अध्ययन केले असता युरोप आणि आशियादरम्यान कॅस्पियन समुद्र, दक्षिण अमेरिकेतील टिटिकाका सरोवर सर्व एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी गमावत आहेत. दरवर्षी 22 गीगाटनाच्या दराने हे जलस्रोत पाण्याला मुकत आहेत. मागील तीन दशकांपासून असे घडत आहे.

अमेरिकेतील सर्वात मोठा जलस्रोत लेक मीडमध्ये जितके पाणी असते, त्याच्या 17 पट पाणी म्हणजे 22 गीगाटन इतके होते. युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाचे सरफेस हायड्रोलॉजिस्ट फँगफँग याओ यांनी या अध्ययनाचे नेतृत्व केले आहे, त्यांचे अध्ययन सायन्स नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. नैसर्गिक सरोवरांची जलपातळी आणि स्रोतात 56 टक्क्यांची घट झाल्याचे या अध्ययनात दिसून आले आहे. पाण्याच्या प्रमाणात घट होण्यामागे सर्वात मोठे कारण माणसांकडून वाढलेला वापर आणि वाढलेले तापमान आहे. उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. पूर्ण जगात तापमान सातत्याने वाढत असल्याने जलस्रोतांसाठी ते नुकसानदायी आहे.
दुष्काळग्रस्त भागात जलस्रोत आटत असल्याची धारणा आहे, परंतु असे घडत नाही. आता आर्द्रतायुक्त भागातील जलस्रोतही आटत चालले आहेत असे फँगफँग यांनी सांगितले आहे. फँगफँग आणि त्यांच्या टीमने जगभरातील 2 हजारांहून अधिक मोठ्या सरोवरांचे अध्ययन केले आहे.

माणसांकडून पाण्याचा वाढलेला वापर, पावसाच्या पॅटर्नमध्ये झालेला बदल, मातीची धूप, वाढलेले तापमान या कारणांमुळे जगभरातील सरोवरांची पातळी कमी झाल्याचे अध्ययनात दिसून आले. 1992-2020 पर्यंत 53 टक्के सरोवरांची जलपातळी अत्यंत वेगाने घटली आहे किंवा ही सरोवरं आटली आहेत. या सरोवरांच्या परिसरात राहणारी 200 कोटीची लोकसंख्या आता पाण्याच्या टंचाईला तोंड देत आहे. मागील काही वर्षांमध्ये पाण्याच्या टंचाईमुळे त्यांची स्थिती अधिकच खराब झाली आहे. सरासरी जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होऊ देऊ नये असे वैज्ञानिक सातत्याने सांगत आहेत. सध्या सरासरी जागतिक तापमानवाढ 1.1 अंश सेल्सिअस इतके आहे. जर हे प्रमाण 1.5 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यास पूर्ण जगात दुष्काळसदृश स्थिती निर्माण होणार आहे. मग आटलेल्या सरोवरांच्या जमिनींमध्ये अतिक्रमण होण्याचा धोका निर्माण होणार आहे. मध्य आशियात अरल सागर, मध्यपूर्वेत मृत समुद्र, अफगाणिस्तान, इजिप्त आणि मंगोलशियातील सरोवरे वाढत्या तापमानामुळे स्वत:चे जलक्षेत्र गमावत आहेत.









