कमी पाण्यामुळे पिकांना फटका : ढगाळ वातावरण असून पावसाची हुलकावणी
वार्ताहर /नंदगड
गेले महिनाभर पावसाने ओढ दिली. त्यातच प्रखर ऊन पडू लागले. आज ना उद्या पाऊस पडेल या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले होते. परंतु ती आशा आता फोल ठरली आहे. निम्म्याहून अधिक जमिनीतील भातपिके सुकून गेली आहेत. पाण्याची सोय नसलेल्या शेतकऱ्यांनी पिकाची आशा सोडून दिली आहे. तर शेताजवळ नदी, नाले, बोअरवेल असलेले शेतकरी भातपिकाला पाणी देत आहेत. यावषी मुळातच पाऊस उशिरा झाला असला तरी जुलै महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने सर्वत्र नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. भात, ऊस, भुईमूग या प्रमुख पिकासह अन्य पिके जोमात आली होती. रासायनिक खतेही घातली होती. त्यामुळे भातपीक तरारून आले होते. असे असताना मध्यंतरीच्या हलक्मयाशा एक-दोन सरी वगळता तब्बल महिनाभर पाऊस गायब झाला. रोजच सकाळच्या वेळेत आकाशात ढग दाटून येत होते. परंतू पावसाने हुलकावणीच दिली आहे. दुपारी प्रखर ऊन व सायंकाळी निरभ्र आकाश दिसत होते. त्यामुळे पावसाची केवळ प्रतीक्षा ठरली आहे. मलप्रभा नदीकाठावरील शेतवडीत तर पूर्व भागात पाण्याचा स्त्राsत असलेल्या शेतामधून अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लागवड केली आहे. जुलै महिन्यात सर्वच शेतकऱ्यांनी रासायनिक खते घातली आहेत. त्यानंतर मात्र पाऊसच गायब झाल्याने भात पिकाची वाढ खुंटली आहे. कमी पाण्याच्या माळरानावरील जमिनीत शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाची लागवड केली आहे. ही पिके प्रकार उन्हाने पूर्णत: सुकून गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांवर पाणी सोडले आहे.
राजहंसगड परिसरातील भातपिके पूर्णपणे सुकली : बळीराजा संकटात
किणये : राजहंसगड परिसरातील भातपिके पावसाअभावी सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतशिवारातील भात, सोयाबीन, भुईमूग, बटाटे, रताळी ही पिके पाऊस नसल्यामुळे वाळून जात आहेत. यामुळे या भागातील बळीराजा संकटात सापडला आहे.गेल्या दोन-तीन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे मात्र पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात व सप्टेंबरच्या प्रारंभी या भागात पाऊसच झाला नाही. यामुळे शेतशिवारातील पिके वाळून जाऊ लागली आहेत. पाऊस आला नाहीतर पिके जगणार कशी, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. शेतशिवारात भात, सोयाबीन, भुईमूग, बटाटा, रताळी पिके बऱ्यापैकी बहरून आली आहेत. मात्र फळधारणा व बहरून येण्याच्या कालावधीतच पावसाने दडी मारल्यामुळे पीक उत्पादन घटणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. ढगाळ वातावरण दिसून येत आहे. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र राजहंसगड व पश्चिम भागातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत घट
तालुक्यात यंदा म्हणावा तसा मान्सून झाला नाही. गेल्या महिन्याभरापासून पावसाने हुलकावणी दिली असल्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील व राजहंसगड परिसरातील नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. शेतीशिवारे कोरडी पडलेली आहेत. अशीच दडी मारली तर पिकांचा लवलेशही राहणार नसल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.









