अजय’ अभियानाअंतर्गत इस्रायलहून विमानप्रवास
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष पेटल्याने भारताने इस्रायलमध्ये असलेल्या आपल्या नागरीकांना भारतात सुरक्षित परत आणण्यासाठी ‘अजय’ हे अभियान चालविले आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत चारशेहून अधिक भारतीय नागरीकांना देशात परत आणण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ शुक्रवारपासून करण्यात आला होता. प्रथमदिनी 212 भारतीय परतले होते.
शनिवारी दुसरे विमान 235 भारतीयांना घेऊन परतले आहे. केंद्र सरकार ही सेवा विनामूल्य देत आहे. इस्रायलची राजधानी तेल अवीव येथील बेनगुरियान विमानतळावरुन त्यांना परत आणण्यात आले. इस्रायलमध्ये साधारणत: 18 हजार भारतीय नागरीक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या सर्वांना टप्प्याटप्प्याने परत आणण्यात येईल, असे परराष्ट्र व्यवहार विभागाने स्पष्ट केले.
प्रतिदिन एक विमान
इस्रायल-हमास संघर्ष होत असेपर्यंत भारत हे अभियान चालविणार असून प्रत्येक दिवशी एक किंवा दोन विमानांमधून भारतीय नागरीकांना परत आणण्यात येईल. आवश्यकता भासल्यास, किंवा संघर्ष वाढल्यास विमानफेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. परतलेल्या भारतीयांनी केंद्र सरकारचे आभार मानले असून त्याने त्वरित व्यवस्था केल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. परतलेल्या अनेक प्रवाशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही व्यक्तीश: आभार मानले आहेत.









