भाविकांचे सढळ हस्ते दान : आजपर्यंतचा विक्रमी निधी
वार्ताहर/बाळेकुंद्री
कर्नाटक-महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिराची दानपेटी बुधवारी खोलण्यात आली. यंदा यल्लम्मा देवीच्या भक्तांनी तीन महिण्यात तीन कोटी 81 लाखाहून अधिक रकमेचे दान रेणुकाचरणी अर्पण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेली मोजणी बुधवारी पूर्ण झाली. या दानपेट्यांतील रकमेची ईन पॅमेराव्दारे भाविकांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली आहे. दानपेटीतील आजपर्यंतचा हा विक्रमी निधी आहे.
यासाठी यल्लम्मा मंदिराचे शासनाधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधित देवस्थान विकास प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी यांनी रितसर अनुमती घेऊन दानपेटी खोलण्यात आली. यातील रक्कम व मौल्यवान दागिने मोजण्यात आले. दानपेटीत 3 कोटी 39 लाख 40 हजार रोख रक्कम, 32 लाख 94 हजार किमतीचे 340 ग्रॅम सोने व 9 लाख 79 हजार रुपये किमतीच्या चांदीची मोजणी करण्यात आली.
निधी पायाभूत सुविधांसाठी वापरणार
यावेळी देवस्थान विकास प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मंदिराच्या विकासाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सदर निधी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी मुजराई खात्याचे अधिकारी, देवस्थानचे उपकार्यदर्शी नागरत्ना चोळीन, डी. आर. चव्हाण, अन्नपूर्णा बाहयहट्टी, पॅनरा बँकेचे व्यवस्थापक, कर्मचारी व देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.









