त्वरित दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून अंगाची काहिली होत आहे. काही गावांना आतापासूनच पाण्याची कमतरता भासत आहे. जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत.
जिल्ह्यात 1315 पाणी शुद्धीकरण केंद्रे असली तरी यातील 106 केंद्रे बंद पडली आहेत. केंद्रे बंद असलेल्या गावांतील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. संबंधित विभागाने नादुरुस्त केंद्रे त्वरित दुरुस्त करावीत, अशी मागणी होत आहे.
बेळगाव शहरात जिल्हाधिकारी कार्यालय आवार, बिम्सचे आवार, यासह विविध ठिकाणी पाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत. यापैकी 14 केंद्रे नादुरुस्त आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नागरिकांची नेहमी वर्दळ असते. बिम्सच्या आवारातही प्रतिदिनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असते. प्रमुख स्थळावरीलच पाणी शुद्धीकरण केंद्रे बंद पडली असल्याने पैसे देऊन बाटलीतील पाणी खरेदी करण्याची वेळ आली आहे.
बेळगाव आणि चिकोडी विभागात एकूण 1315 पाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत. यापैकी बेळगाव विभागातील 54 तर चिकोडी विभागातील 52 केंद्रे अशी 106 केंद्रे बंद पडली आहेत. सरकारने एक पाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी किमान 5 लाख रुपये खर्च केले आहेत. जिल्ह्यात 1315 पाणी शुद्धीकरण केंद्रे उभारण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. पण ऐन उन्हाळ्यातच काही गावांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. नादुरुस्त पाणी शुद्धीकरण केंद्रे त्वरित दुरुस्त करण्यासाठी संबंधित खात्याने पावले उचलावीत जेणेकरून किमान उन्हाळ्यात तरी जनतेला शुद्ध पाणी मिळू शकते.









