हृदयरोगापासून मधुमेहापर्यंतच्या औषधांचा समावेश : रुग्णांच्या खिशावर ताण वाढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच महागाईचा फटकाही जनतेला बसला आहे. सरकारने 1 एप्रिलपासून 900 हून अधिक आवश्यक औषधांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटीने (एनपीपीए) औषधांच्या किमतीत 1.74 टक्के वाढ जाहीर केली आहे. या औषांमध्ये मधुमेह, हृदयरोग, वेदनाशामक, गंभीर संसर्ग, ताप इत्यादी आजारांसाठीची औषधे समाविष्ट आहेत. साहजिकच आता रुग्णांना अनेक औषधांसाठी जास्त पैसे मोजावे लागतील.
एप्रिल महिन्यापासून किंमती वाढलेल्या औषधांमध्ये अॅझिथ्रोमायसिन, इबुप्रोफॉन, डायक्लोफेनाक, मेटफॉर्मिन, हायड्रोक्लोराइड, अॅसायक्लोव्हिर सारख्या गोळ्यांचा समावेश आहे. औषधांच्या किमती घाऊक किंमत निर्देशांकाच्या (डब्ल्यूपीआय) आधारावर अपडेट केल्या जातात. हा बदल दरवर्षी होत असतो. त्यानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात डब्ल्यूपीआयच्या आधारावर औषधांच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत.
सरकारच्या आदेशानंतर, अँटीबायोटिक अॅझिथ्रोमायसिनची किंमत प्रति टॅब्लेट 11.87 रुपये (250 मिग्रॅ) आणि 23.98 रुपये (500 मिग्रॅ) असेल. अमोक्सिसिलिन आणि क्लॅव्हुलेनिक अॅसिडच्या फॉर्म्युलेशनसह अँटीबॅक्टेरियल ड्राय सिरपची किंमत प्रतिमिली 2.09 रुपये असेल. त्याचप्रमाणे, मलेरियावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची किंमत प्रति टॅब्लेट 6.47 रुपये (200 मिलीग्रॅम) आणि 14.04 रुपये (400 मिलीग्रॅम) इतकी असणार आहे. वेदना कमी करणाऱ्या डायक्लोफेनाक या औषधाची कमाल किंमत आता प्रति टॅब्लेट 2.09 रुपये असणार आहे.









