रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हच्या आसपासच्या भागात मोठे हल्ले गेल्या काही दिवसांमध्ये चढविलेले आहेत, असे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात जिवीत हानी झालेली आहे. हल्ले थांबल्यानंतर केलेल्या तपासात 900 हून अधिक मृतदेह आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
युरोपियन महासंघाने या हल्ल्यांचा निषेध केला. रशियन सैनिकांनी निरपराध नागरीकांवर अनन्वित अत्याचार चालविल्याचा आरोप महासंघाने केला. ज्या भागांवर रशियाचे नियंत्रण आहे, तेथे सर्वसामान्य नागरीकांचे जिवित आणि वित्त सुरक्षित नाही, हे स्पष्ट झाले असून रशियाने त्वरित सैन्य मागे घ्यावे असे आवाहन जगातील अनेक संस्थांकडून करण्यात आले आहे.
ठार झालेल्या 900 नागरिकांना गोळय़ा घालून मारण्यात आले आहे. ते बाँबफेकीत किंवा अपघाताने मृत झालेले नाहीत. त्यांना पकडून हेतुपुरस्सर मारण्यात आलेले असल्याने त्यांची हत्या झाली असेच मानण्यात येईल, असा इशारा रशियाला देण्यात आला. परिणाम भोगावे लागतील असे सुनावण्यात आले.









