कमी हजेरीमुळे परीक्षेपासून वंचित
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यात बारावीच्या परीक्षेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन तीन परीक्षा घेण्याचे ठरवून त्याची अंमलबजावणी केली तरी त्याचा विद्यार्थ्यांवर फारसा प्रभाव पडल्याचे दिसून येत नाही. महाविद्यालयातील कमी हजेरीमुळे सहा ते साडेसहा हजार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास अनुमती मिळालेली नाही.
राज्यात 5050 पदवीपूर्व महाविद्यालयांतून 7.13 लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यापैकी 6547 विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील हजेरी 75 टक्क्याहून कमी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा देण्यास अनुमती मिळालेली नाही. परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेचे 3362, वाणिज्य शाखेचे 2078 व विज्ञान विभागाचे 1107 विद्यार्थी आहेत. वार्षिक परीक्षेपासून वंचित राहणारे कला शाखेचे विद्यार्थी अधिक आहेत.
कर्नाटक शिक्षण कायदा-2006 सेक्शन 21 नुसार नियमित विद्यार्थ्यांचे हजेरीचे प्रमाण किमान 75 टक्के असणे आवश्यक आहे. इतकी हजेरी नसल्यास संबंधित विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेसाठी अनुमती देण्यात येत नाही. शिक्षण खात्याने मागील वर्षापासून तीन परीक्षा घेण्याची पद्धत सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अधिकाधिक हजेरी देऊन वार्षिक परीक्षेला सहजरित्या सामोरे जावे, या उद्देशाने सरकारची ही योजना असली तरी याचा पुरेपूर लाभ पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी घेतला नसल्याचे दिसून येते.









