कुडचडेत काँग्रेसच्या चेतना यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचे उद्गार
प्रतिनिधी /कुडचडे
आज कुडचडेतील लोकांची घुस्मट चालेली आहे. पण जे लोक आता पश्चाताप करत आहेत त्यांनी निवडणुकीच्या अगोदर थोडा अधिक जोर लावला असता, तर आज कुडचडेत वेगळे चित्र दिसले असते. पण त्यावर आता बोलून व एकमेकांना दोष देऊन काही उपयोग नाही. आज राज्यात बघितल्यास दिसून येते की, अंदाजे 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोक भाजपवर नाराज आहेत, असे उद्गार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काढले. काँग्रेसच्या चेतना यात्रेच्या दरम्यान कुडचडेतील आपल्या कार्यालयात ते बोलत होते. यावेळी कॅप्टन व्हेरिएटो फर्नांडिस, सुभाष फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मतदारांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात कुठे तरी कमी पडला. त्याचाच परिणाम आज आपल्यासमोर आहे. फक्त काँग्रेसला मतदान केलेलेच नव्हे, तर कुडचडे मतदारसंघातील सर्व मतदारांनी एकत्र यायला पाहिजे. याचा फायदा आपल्यालाच नव्हे, तर आपल्या येणाऱया पिढीला होईल हे विसरता कामा नये, असे पाटकर म्हणाले. गोव्यातील सध्याचे सरकार कोळसा हाताळणीला चालना देत असून त्याचे त्रास गोव्यातील संपूर्ण सामान्य जनतेला पुढे भोगावे लागणार आहेत. कारण जी कोळसा हाताळणी होत आहे त्यातून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे. यावरून गोव्यातील जनतेने जाणून घेतले पाहिजे की, सरकारला सामान्य जनतेचे व पुढील पिढीचे काहीच पडून गेलेले नाही, अशी टीका त्यांनी केली.
भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींचे वर्चस्व स्पष्ट
भाजप याअगोदर टीका करताना सांगायचा की, काँग्रेस पक्षाची सूत्रे हायकमांड हलवतात. पण सत्य गोष्टी आता उघड झालेल्या आहेत. कारण भाजपकडे राज्यात 20 आमदार असून सुद्धा सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्या मुख्यमंत्री, पक्षाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱयांना चार वेळा दिल्लीला भेट द्यावी लागली. सरकार स्थापन करण्यासाठी गोवा भाजपला अकरा दिवस लागले. यावरून भाजपमध्ये सूत्रे फक्त पक्षश्रेष्ठी हलवतात हे स्पष्ट झालेले आहे, असे पाटकर म्हणाले.
15 दिवसांत आरोग्य केंद्र सुरू करून दाखवा
आज कुडचडेची स्थिती काय आहे ते सर्वांना माहिती आहे. ज्या व्यक्तीला कुडचडेतील जनतेने आनंदाने रूजविले त्या जनतेला ही व्यक्ती मंत्रिपदावर असून सुद्धा साधी आरोग्य सेवा देऊ शकलेली. नाही. जर ते खरेच स्वतःला कुडचडेवासियांचे हितचिंतक म्हणवत असतील, तर त्यांनी 15 दिवसांत कुडचडेचे आरोग्य केंद्र पूर्ण सोयीनिशी सुरू करून दाखवावे, असे आव्हान पाटकर यांनी यावेळी स्थानिक आमदारांना दिले. कुडचडेच्या आमदारांना गोव्याचे काहीच पडलेले नाही. निवडणुकीत त्यांनी जो विजय प्राप्त केला तो सरकारी नोकरांवर दबाव घालून प्राप्त केलेला आहे. या आमदाराने कुडचडेतील जनतेचा गैरफायदा घेतलेला आहे, असा दावा कॅप्टन फर्नांडिस यांनी केला.









