निवड प्रक्रियेवेळी कॅन्टोन्मेंट कार्यालयात गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंटमध्ये सध्या विविध पदावर भरती करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सात जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. याकरिता 400 हून अधिक जणांनी अर्ज केले असून, शनिवारी अर्जदारांची चाचणी घेण्यात आली. यावेळी कॅन्टोन्मेंटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भरती प्रक्रियेसाठी तिन्ही माध्यमच्या शाळांना सुटी देण्यात आली होती.
कॅन्टोन्मेंटची नागरी वसाहत महापालिकेत समाविष्ठ करण्याचा प्रस्ताव सुरू आहे तर दुसरीकडे कॅन्टोन्मेंटमधील विविध रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महापालिकेत समावेश करण्यात येत असताना भरती कशाला असा मुद्दाही उपस्थित झाला आहे.
कॅन्टोन्मेंटमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या 7 जागा रिक्त आहेत. या जागांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी कॅन्टोन्मेंटने अर्ज मागविले होते. सात जागांसाठी तब्बल 400 हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. स्वच्छता कामगार पदावरील नियुक्तीसाठी शनिवारी चाचणी घेण्यात आली. अर्जदारांची संख्या जास्त असल्याने कॅन्टोन्मेंट कार्यालयाची जागा अपुरी आहे. त्यामुळे येथील कॅन्टोन्मेंट शाळेमध्ये निवड प्रक्रिया घेण्यात आली. याकरिता कॅन्टोन्मेंटच्या तिन्ही माध्यमच्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती.
अर्जदारांची संख्या जास्त असल्याने निवड प्रक्रियेसाठी शाळेतील शिक्षकांना देखील जुंपण्यात आले होते. एकाच दिवशी सर्व उमेदवार दाखल झाल्याने कॅन्टोन्मेंट कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होवून गोंधळ निर्माण झाला होता. कोणतेच नियोजन करण्यात आले नसल्याने उमेदवारांनाही नाहक त्रास सहन करावा लागला.
एकाच दिवशी सर्व अर्जदारांना बोलावण्याऐवजी टप्प्याटप्प्याने परीक्षा घेतली असती तर गर्दी झाली नसती. पण कॅन्टोन्मेंटच्या अयोग्य नियोजनामुळे गोंधळ झाल्याची चर्चा उमेदवारांमध्ये सुरू होती.









