ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 40 समर्थक आमदारांच्या सह्या घेतल्याचे वृत्त मीडियामध्ये आहे. पण तसे काहीही नाही. मी अद्याप कोणत्याही पत्रावर सही केलेली नाही. पण चाळीसच काय 40 पेक्षा जास्त आमदारही त्यांच्यासोबत जाऊ शकतात. थोडा वेळ थांबा सर्व चित्र स्पष्ट होईल, असे राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपबरोबर जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांच्यासोबत शेवटपर्यंत कायम राहणारे राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अजितदादा दुसऱ्या पक्षाबरोबर जाणार आहेत, हे तुम्हाला आम्हाला नक्की माहिती नाही. मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे. हे महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे. ते जो निर्णय घेतील, त्यावेळी नक्कीच त्यांच्यासोबत आम्ही राहू. आज विधानभवनात मी त्यांची भेट घेणार आहे. 40 आमदारांच्या अजितदादांनी सह्या घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे. पण मी कशावरही सही केलेली नाही. त्यामुळे त्याबद्दल मला माहिती नाही, असे बनसोडे म्हणाले.








