डर्बनमध्ये मुसळधार पाऊस, पुरामुळे 321 हून अधिक लोकांचा मृत्यू
डर्बन / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहर आणि पूर्वेकडील क्वाझुलु-नाताल प्रांतात अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पुरामुळे सुमारे 321 लोकांचा बळी गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अजूनही पर्जन्यवृष्टी कमी झाली नसून अनेक कुटुंबे बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहणार असून बाधित भागातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्मयता आहे.
संततधार पावसामुळे देशाच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरे कोसळली असून इमारतींचेही नुकसान झाले आहे. डर्बन आणि आसपासच्या इथाक्विनी महानगर क्षेत्रात सुमारे 52 दशलक्ष डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुमारे 120 शाळा पुराच्या पाण्याने वेढल्या आहेत. पुरामुळे विविध शाळांमधील सुमारे 18 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तसेच अंदाजे 26 दशलक्ष डॉलरपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाने शाळा तात्पुरत्या बंद केल्या असल्याचे इथाक्विनीचे महापौर मॅकिलोसी कुंडा यांनी सांगितले.









