काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचा दावा : ‘इंडिया’च्या बैठकीला 23 नेत्यांची हजेरी, ममता अनुपस्थित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या तासाभरापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘इंडिया’ आघाडीला किमान 295 जागा मिळतील, असा दावा केला. खर्गे यांच्या निवासस्थानी शनिवारी दुपारी झालेल्या ‘इंडिया’च्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. ही बैठक अडीच तासांहून अधिक काळ चालली. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर इतर पक्षांनी काँग्रेसच्या दाव्याप्रमाणे सुरात सूर मिसळला. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 4 जूनला मंगळवार असून तो दिवस ‘इंडिया’ आघाडीसाठी ‘मंगल’ असल्याचे स्पष्ट केले. तसेच समाजवादी पक्ष आणि ‘इंडिया’ला उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा मिळतील, असेही ते म्हणाले. याचदरम्यान राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीही आम्ही 295 हून अधिक जागा जिंकू असे सांगतानाच ‘इंडिया’ आघाडी आणि देशातील जनता जिंकत असल्याचे वक्तव्य केले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शनिवारी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेण्याबरोबरच पुढील रणनीतीवरही चर्चा करण्यात आली. सोनिया, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, शरद पवार, अखिलेश यादव, सीपीआयचे डी राजा, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह 23 नेते या बैठकीला उपस्थित होते. मात्र, या बैठकीपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी लांब राहिल्या होत्या.
‘इंडिया’ आघाडीला 295 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज आहे. सर्व नेत्यांना विचारून ही आकडेवारी मिळाल्याचे खर्गे यांनी सांगितले. या आकडेवारीत कोणताही बदल झालेला नाही. हे जनतेचे सर्वेक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने आमच्या नेत्यांना जे सांगितले आणि कळवले त्याआधारे आम्ही हे सांगत आहोत. सरकारी सर्वेक्षणातील आकडे वेगळे असले तरी जनतेला काय वाटते ते आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत, असेही ते पुढे म्हणाले.
एक्झिट पोल चर्चेत काँग्रेस सहभागी
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानानंतर आयोजित एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसने सहभागी होण्याचा निर्णय ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर जाहीर केला. ‘इंडिया’ आघाडीच्या निवडणुकोत्तर बैठकीत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी काँग्रेसने एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल करत पराभवाची कुणकुण लागल्याने काँग्रेसचे नेते चर्चेपासून दूर राहत असल्याचे म्हटले होते.
बैठकीत सहभागी नेते
मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल (काँग्रेस), अखिलेश यादव (सपा), शरद पवार, जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी), अरविंद केजरीवाल, भगवंत मान, संजय सिंह आणि राघव चढ्ढा (आप), टी. आर. बालू (द्रमुक), तेजस्वी यादव आणि संजय यादव (आरजेडी), चंपाई सोरेन आणि कल्पना सोरेन (जेएमएम), फाऊख अब्दुल्ला (जम्मू काश्मीर एनसी), डी. राजा (सीपीआय), सीताराम येचुरी (सीपीआय-एम), अनिल देसाई (शिवसेना- यूबीटी), दीपंकर भट्टाचार्य (सीपीआय-एमएल), मुकेश साहनी (व्हीआयपी).









