सर्वच मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती, अर्ज माघारीनंतर रिंगणातील पक्षनिहाय उमेदवार
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीतील लढतींचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. बेळगाव जिल्ह्यामधील 18 मतदारसंघात एकूण 288 उमेदवार रिंगणात असून राज्यात एकूण 2,613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वच मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होणार आहेत. त्यानंतर आता 10 मे ह्या मतदानाच्या आणि 13 मे ह्या निकालाच्या दिवसांची सर्वांना उत्सुकता आहे.
बेळगाव जिल्ह्यात एकंदर 18 मतदारसंघात 306 जणांनी एकूण 360 अर्ज दाखल केले होते. शुक्रवार दि. 21 रोजी अर्जांची छाननी झाली. त्यामध्ये 25 जणांचे अर्ज अवैध ठरले होते. त्यानंतर सोमवार दि. 24 रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये 47 जणांनी माघार घेतली आहे. विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा सोमवारी अंतिम दिवस होता. त्या दिवशी दुपारी 18 विधानसभा मतदारसंघातून 47 जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता एकूण 288 जण रिंगणात आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघातून 360 अर्ज दाखल झाले होते. त्यामधील 25 अर्ज अवैध ठरले होते. 335 जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामध्ये आता 47 जणांनी माघार घेतल्यामुळे 288 जण रिंगणात आहेत.
राज्यात भाजप, काँग्रेस, निजदमधील 16 बंडखोरांची माघार
निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने काँग्रेस, भाजप, निजदमधील अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केले होते. त्यापैकी अनेकांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. तर काहींनी ठाम भूमिका घेत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला श•t ठोकला आहे. नेत्यांनी अखेरच्या क्षणी केलेल्या प्रयत्नांचे फलित म्हणून सोमवारी भाजप, काँग्रेस आणि निजदमधील 16 बंडखोर उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे तिन्ही राजकीय पक्षांसह त्यांच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. माघार घेतलेल्यांमध्ये भाजपच्या 7, काँग्रेसच्या 6 आणि निजदच्या 3 बंडखोरांचा समावेश आहे.
राज्यभरातून 3130 उमेदवारांकडून 5,101 अर्ज दाखल झाले होते. सोमवारी अखेरच्या दिवसापर्यंत 517 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता एकूण 224 मतदारसंघांत 2,613 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामध्ये 184 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
धारवाड जिल्ह्यात जोशींच्या प्रयत्नांना यश
धारवाड जिल्ह्यात धारवाड आणि हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघात भाजपला बंडखोरीची चिंता होती. केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रयत्नांना यश आले असून येथे बंडखोरी केलेल्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. धारवाड मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार अमृत देसाई यांना तिकीट दिले होते. त्यामुळे नाराज झालेल्या बसवराज कोरवर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. प्रल्हाद जोशी यांनी कोरवर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन माघार घेण्यासाठी दबाव आणला. याचे फलित म्हणून कोरवर यांनी सोमवारी उमेदवारी मागे घेतली. हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघात भाजपने मोहन लिंबिकाई यांना तिकीट दिले होते. त्यामुळे नाराज झालेले हनुमंतसा निरंजन यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांचीही समजूत काढण्यात जोशी यशस्वी ठरले. त्यामुळे हनुमंतसा निरंजन यांनीही अर्ज मागे घेतला आहे.
शारदा शेट्टींची माघार अन् राजकीय निवृत्ती
कुमठा मतदारसंघात काँग्रेसने माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचे पुत्र निवेदीत अल्वा यांना तिकीट दिले होते. त्यामुळे नाराज झालेल्या शारदा शेट्टी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान दिले होते. त्यामुळे बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शारदा शेट्टींशी फोनवरून चर्चा केली. त्यामुळे शेट्टी यांनी अर्ज मागे घेत राजकीय निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकीय निवृत्ती घेतल्यामुळे कुणाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. कोणाला पाठिंबा द्यावा, हा निर्णय घेण्यास आपले समर्थक स्वतंत्र आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
उडुपीत काँग्रेसच्या बंडखोरी उमेदवाराची माघार
उडुपीत काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी शमविण्यात डी. के. शिवकुमार यशस्वी ठरले आहेत. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रसादराज कांचन यांच्याविरुद्ध के. कृष्णमूर्ती आचार्य यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. अखेर शिवकुमार यांनी कृष्णमूर्ती यांची भेट घेऊन समजूत काढली. ब्त्यामुळे सोमवारी त्यांनी अर्ज मागे घेतला. सायंकाळी शिवकुमार यांनी प्रसादराज यांच्यावतीने प्रचारही केला.
चिक्कपेठमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला दिलासा
बेंगळूरच्या चिक्कपेठ मतदारसंघात तिकीट न मिळाल्याने काँग्रेस नेत्या व माजी महापौर गंगांबिका मल्लिकार्जुन यांनी बंडखोरी केली. या ठिकाणी आर. व्ही. देवराज यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. अखेर गंगांबिका यांची नाराजी दूर करण्यात पक्षनेते यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे गंगांबिका यांनी सोमवारी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
निजद उमेदवाराच्या माघारीमुळे संशय
मंगळूरमध्ये उळ्ळाल विधानसभा मतदारसंघात निजद उमेदवार अल्ताफ कुंपल यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत माहिती न देताच 21 एप्रिल रोजी अर्ज मागे घेतला आहे. त्यांचा मोबाईलही स्वीच ऑफ होता. सोमवारी ते अचानक प्रसारमाध्यमांसमोर हजर झाले. काँग्रेस नेत्यांनी आपल्याला धमकावून अर्ज मागे घेण्यास सांगितले होते, असा आरोप कुंपल यांनी केला आहे. कुंपल यांच्या या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
एआयएडीएमकेच्या एकमेव उमेदवारांची माघार तामिळनाडूतील प्रादेशिक पक्ष असलेल्या एआयएडीएमकेने राज्यातील निवडणुकीसाठी एकमेव उमेदवार दिला होता. बेंगळूरच्या पुलकेशीनगरमध्ये या पक्षातर्फे अन्बरसन यांना तिकीट देण्यात आले होते. त्यांनी अर्जही दाखल केला होता. मात्र, भाजपने केलेल्या विनंतीवरून एआयएडीएमकेचे प्रमुख नेते पलानीस्वामी यांनी अन्बरसन यांना अर्ज मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार अन्बरसन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला









