चार लाख रूपयाचे नुकसान
बाळेकुंद्री : बैलहोंगल तालुक्यातील दौडवाडनजीक गवतगंज्यांना अचानक आग लागून सुमारे चार लाखाहून अधिक गवतगंज्या आगीत भस्मसात झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. घटनेत 20 हून अधिक गवतगंज्या आगीत भस्मसात झाल्याने गावातील विविध शेतकऱ्यांचे चार लाखांहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे. खुल्या जागेत एकमेकांना लागून गावातील शेतकऱ्यांनी कडबा, पेंजराच्या गवतगंज्या घातल्या आहेत. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अचानक गवतगंज्यांनी पेट घेतल्याचे समजताच तातडीने युवक व शेजारच्या कांही शेतकऱ्यानी आग पाण्याने विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीने रौद्ररूप धारण केल्याने कांही क्षणातच गवतगंज्यांना आगीने घेरले, सदर माहिती जवळच असलेल्या बैलहौंगल येथील अग्निशमन दलाला कळविल्याने पाण्याच्या सर्व गाड्या तातडीने हजर झाल्या. पाण्याचा पाण्याचा फवारा युवकांनी सुरू केला. यावेळी नागरिकांच्या सहकार्यामुळे सुमारे तीन तास अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. गवतगंज्यांना आग लागण्याच्या घटनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, जनावरांसाठी गोळा करून ठेवलेला चारा आगीच्या भक्षस्थानी पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दौडवाड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.









